एकूण नफ्याच्या ११ टक्के रक्कम दिली सभासदांना:वार्षिक सभेनंतर अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती..
ओरोस ता १
२०२४-२५ या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ११६ कोटींचा आर्थिक नफा झाला आहे. त्यामुळे सभासद संस्थांना एकूण नफ्यातील ११ टक्के नफा लाभांश म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वार्षिक सभा सुरू असताना १४३८ सभासद संस्थांच्या खात्यावर ५ कोटी ६४ लाख ३८ हजार रुपये एवढा लाभांश थेट जमा करण्यात आला आहे, अशी माहिती वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
४२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २०२४-२५ या आर्थिक वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे मंगळवारी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली होती. मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा मोठ्या उत्साहात आणि सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाली. यानंतर अध्यक्ष दळवी यांनी सभेची माहिती त्याच ठिकाणी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, प्रकाश मोर्ये, गजानन गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, रवींद्र मडगावकर, समीर सावंत, विद्याधर परब, दिलीप रावराणे, व्हिक्टर डांटस, गणपत देसाई, निता राणे, आत्माराम ओटवणेकर, मेघनाथ धुरी, प्रकाश बोडस आदी उपस्थित होते.