अवैधरित्या आढळला २१० ब्रास वाळूसाठा..
कुडाळ : महसूल विभागाच्या पथकाने कुडाळ तालुक्यातील झाराप – मुस्लिमवाडी येथे छापा टाकून बिगर परवाना अवैध असा २१० ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी रात्री ८ वा. ही कारवाई केली. याबाबत चौकशी केली असता, हा वाळू साठा इर्शाद मुजावर (रा. झाराप खानमोहल्ला ) याची असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. संबंधितावर नोटीस बजावणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिली.
झाराप – मुस्लिमवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा असल्याची तक्रार कुडाळ महसूल विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी उशिरा कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार जाधव पथकासह त्या परिसरात दाखल झाले. या पथकात जाधव यांच्यासोबत मंडळ अधिकारी जांभवडेकर, झाराप तलाठी निलेश कांबळे, झाराप पोलीस पाटील, हुमरस पोलीस पाटील, झाराप कोतवाल पौर्णिमा कुडाळकर यांचा समावेश होता.
. झाराप – मुस्लिमवाडी परिसरात वाळूचा साठा असल्याचा शोध घेत असताना तेथे वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनाला आले. त्याच परिसरात सहा ठिकाणी वाळूचे साठे आढळले. या भागात तपासणी केल्यावर सुमारे २१० ब्रास अववैध वाळू साठा आढळून आला. यावेळी फथकाने पंचनामा करून वाळू जप्त करण्यात आली. हा वाळूसाठा इर्शाद मुजावर याचा असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. संबंधिताचा जबाब घेण्यात आला.
दरम्यान, तहसीलदार वीरसिंग वसावे याच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने हि कारवाई केली. विनापरवाना अनधिकृत वाळूचा साठा झाराप मुस्लिमवाडी भागात आढळला. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार जाधव यांनी सांगितले.
सध्या कर्ली खाडीपात्रातील अधिकृत वाळू उत्खनन बंद आहे. मात्र, अनधिकृत वाळू उपसा करून काही भागात वाळूचा साठा वाळूमाफियामार्फत केला जातो. छुप्या पद्धतीने केलेला हा साठा नंतर चोरट्या पद्धतीने विकला जातो. झाराप येथील या कारवाईंमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. सध्या अधिकृत वाळू उत्खनन बंद आहे. काही भागात पूर्वीचे अनधिकृत वाळू साठे असण्याची शक्यता आहे. कुडाळ महसूल पथकाने यापुर्वी काहीवेळा अशाप्रकारचे वाळू साठ्यावर कारवाई करत जप्त केले आहेत.