दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुण्यातील चालक ताब्यात…

बांदा/प्रतिनिधी
भरधाव वेगात मोटर चालून दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटार चालक राहुल शरद कुबल (वय ४०, रा. पुणे) याला बांदा पोलिसांच्या पथकाने पुणे-बाणेर येथून आज अटक करण्यात आले. तसेच त्याची अपघातग्रस्त डस्टर मोटार (एमएच १२ जीएम २८०९) ताब्यात घेण्यात आली. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर सटमटवाडी येथे २७ एप्रिल रोजी झाला होता.
या अपघातात मोटारीने दुचाकीला पाठीमागून धडक देत तब्बल १०० मीटर फरफटत नेले होते. या अपघातात सेवानिवृत्त एसटी बस चालक उत्तम पडवळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. बांदा पोलिसात अज्ञात मोटार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांदा पोलीस मोटर चालकाच्या मागावर होते. सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून पोलिसांनी आरोपी मोटर चालकाचा शोध घेतला.
मोटर चालक पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बांदा पोलिसांच्या पथकाने त्याला पुण्यातून शिताफिने ताब्यात घेतले. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिताकांत नाईक, हवालदार धनंजय नाईक, सुशांत हेर्लेकर यांचा समावेश होता. चालक कुबल यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला उद्या सावंतवाडीतील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले.
फोटो:-
बांदा पोलिसांनी ताब्यात घेतलेली मोटार. (छायाचित्र- निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page