बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सदर वस्तू केली निकामी : कोणताही धोका नाही..
वेंगुर्ले प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी काल समुद्रातून वाहून आलेला संशयास्पद सिलेंडर सारखी वस्तू आढळून आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग ओरोस च्या पथकाने आज त्या वस्तूची पाहणी करून सुरक्षिततेच्या कारणास्तव ओपन करून निकामी केली आहे. त्यामुळे आता कोणताही धोका नसून घाबरण्याचे कारण नाही असे या पथकाने जाहीर केले.
वायंगणी समुद्रकिनारी काल संशयास्पद सिलेंडर सारखी वस्तू सागर सुरक्षारक्षक तथा कासव मित्र सुहास तोरस्कर यांना दिसून आली. त्यांनी तात्काळ याबाबत माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी सदर घटना जिल्हा पोलीस विभागाला कळविली. त्यानुसार आज सकाळी बॉम्ब शोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग ओरोस चे पथक वायंगणी येथे दाखल झाले. त्यांनी सदर वस्तूची पाहणी केली. ती वस्तू बाँब नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव योग्य पद्धतीने ती वस्तू निकामी करण्यात आली आहे.
सध्याचे वातावरण योग्य नसल्याने वेळीच तोरस्कर यांनी या वस्तूची माहिती दिल्याबद्दल बॉम्बशोधक पथकाने तोरस्कर यांचे आभार मानले. यावेळी पथकामध्ये अधिकारी श्री. साटम, भालचंद्र दाभोलकर, श्री. कुराडे आणि चालक जाधव यांचा समावेश होता.