⚡बांदा ता.२५-: येथील पीएम श्री केंद्रशाळा बांदा नंबर १ चा पहिलीत इयत्तेत शिकणारा विद्यार्थी सुभाष मोरया याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून ठिकठिकाणी चावा घेतल्याने तो जखमी झाला. येथील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते ओंकार नाडकर्णी साई करमळकर यांनी तात्काळ या विद्यार्थ्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नाडकर्णी यांनी केला आहे.
शाळा सुरू असताना सदरचा विद्यार्थी हा मुख्य गेट उघडून बाहेर गेलाच कसा असा सवाल नाडकर्णी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सदरच्या विद्यार्थ्यावर कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याने तो रडत उभा होता. याची माहिती ओंकार नाडकर्णी व साई करमळकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी बांदा आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याठिकाणी उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
श्री नाडकर्णी यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत शाळेच्या वेळेत विद्यार्थी बाहेर गेलाच कसा तसेच याबाबत शिक्षकांना कोणतीही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पहिलीत शिकणारा चिमुकला जखमी…
