घटनास्थळापासून २ किमी अंतरावर कपारीत आढळला मृतदेह
कुडाळ : कुडाळ तालुक्यात माणगांव खोऱ्यातील कर्ली नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वसोली सतयेवाडी येथील कुत्रेकोंड कॉजवेवर अमित मोहन धुरी (३०, रा. .माणगांव धरणवाडी) वाहून गेला होता. त्याचा मृतदेह काॅजवे पासून दोन किलोमीटर अंतरावर वसोली येथील महात्मा राय याठिकाणी नदीपात्रात सापडला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह नदी पात्रातील पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
माणगांव धरणवाडी येथील अमित धुरी व माणगाव डोबेवाडी येथील सखाराम कानडे हे दोघेही वसोली सतयेवाडी येथे जात असताना सोमवारी रात्री ८ वा.च्या सुमारास स्पेल्डर मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले.सुदैवाने सखाराम कानडे यांना झाडाचा आधार मिळाला व ते बाहेर आल्याने बचावले.या घटनेची माहिती मिळताच सोमवारी रात्रीच कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली होती. मंगळवारी सकाळी एनडीआरएफ पथकासह प्रशासनाने नागरीकांच्या सहकार्याने घटनास्थळी कर्ली नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अमितचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने शोधमोहीम आटोपती घेतली होती.
आज बुधवारी पुन्हा स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. यावेळी काॅजवेपासुन दोन किमी अंतरावर अमितचा मृतदेह दगडाच्या कपारीत झाडांमध्ये अडकून पडलेला स्थानिक नागरीकांच्या निदर्शनास आला. याची माहिती माणगांव पोलिस दुरक्षेत्रचे हे काॅ.सखाराम भोई यांना देण्यात आली; त्यांनी मृतदेहाची खात्री केली व स्वतः पाण्यात उतरून मनोहर गुंजाळ, बापू बागवे व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
या शोध मोहीमेत वसोली सरपंच अजित परब,तलाठी अनिल राणे,पोलीस काॅस्टेबल आनंद पालव, प्रकाश कदम, कृष्णा सावंत, राजेंद्र परब, दिपक वारंग आदी सहभागी झाले होते. तसेच परिसरातील पोलिस पाटील यानींही सहभाग घेतला होता. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी येऊन माहीती घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याच्या सुचेना दिल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.सायंकाळी माणगांव धरणवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अमितच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमितच्या अकाली व अपघाती जाण्याने धुरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आई-वडील व भावंडांचा आक्रोश ह्दय पिळवटून टाकणारा होता.अमितच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.