गावकऱ्यांची स्वातंत्र्य दिनापूर्वी दुरुस्तीची मागणी..
⚡आंबोली ता.२२-:
चौकुळ गावातील अभिमान असलेली ‘माझी सैनिक’ ही इमारत अलीकडील जोरदार वादळ व वाऱ्यामुळे मोठ्या नुकसानीस सामोरी गेली आहे. देशासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या माजी सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या इमारतीचे छप्पर पूर्णपणे उडून गेले असून, त्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
ही इमारत चौकुळ गावाच्या शौर्याची व देशभक्तीची जिवंत साक्ष होती. त्यावर आलेले हे संकट केवळ भौतिक नुकसान नाही, तर गावाच्या आत्म्यालाच झालेला घाव आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, तातडीने पंचनामा व चौकशी करून, येणाऱ्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी इमारतीची दुरुस्ती करून त्या ठिकाणी पुन्हा राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण करण्यात यावे.
“ही वास्तू आमच्या माजी सैनिकांचा गौरव आहे. त्यांच्या सन्मानासाठी, आणि पुढच्या पिढ्यांमध्ये देशभक्तीचे बीज पेरण्यासाठी, या स्मारकाची लवकरात लवकर दुरुस्ती होणे आवश्यक आहे,” असे कळकळीचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.