नितेश पेडणेकर यांची नगरपालिकेकडे मागणी..
⚡मालवण ता.२०-:
मालवण शहरात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणे गरजेचे असून यामध्ये प्रामुख्याने मालवण शहरातील विविध पर्यटन स्थळांचा मार्ग दर्शविणारे फलक त्या त्या मार्गांवर लावण्यात यावेत तसेच वाहतुकीच्या दृष्टीने नो एंट्री व एक दिशा मार्गाचे फलक लावण्यात यावेत, हे फलक स्टेनलेस स्टील मध्ये लावण्यात यावेत, अशी मागणी मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते नितेश पेडणेकर यांनी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालवण शहरातील राजकोट किल्ला, चिवला बीच, रॉक गार्डन, जय गणेश मंदिर, रामेश्वर मंदिर, श्री एकमुखी दत्तमंदिर भरड, श्री गणपती मंदिर- आडारी, शिवकालीन श्री मौनीनाथ मंदिर यासह इतर पर्यटन स्थळांचे फलक त्यां पर्यटन स्थळाच्या मध्यवर्ती ठिकाणी व मार्गावर लावण्यात यावे. तसेच जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला व राजकोट किल्ला येथील फलक बनविताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात यावा. मालवण बंदर जेटी रोडवरील जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला प्रवेशद्वार येथील फलक हा स्टेनलेस स्टील पद्धतीमध्ये बनवून लावण्यात यावा.
तसेच मालवण शहरातील रस्त्यांवरील अनेक स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांना त्रास होतो. त्यामुळे लवकरात लवकर शहरातील स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत. तर मालवण बंदरजेटीवरील हायमॉस्ट टॉवर हा कधी बंद तर कधी चालू अवस्थेत असतो, हा टॉवर रात्रीचा कायमस्वरुपी चालू राहण्यासाठी उपाययोजना करावी. मालवण बंदरजेटी येथे येणारे पर्यटक हे वाहतूकीसाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. तरी मालवण शहरात नो एंट्री फलक हा बॅनर स्वरुपात न लावता स्टेनलेस स्टील पद्धतीमध्ये बंदरजेटी येथे उजव्या बाजूला चॅपेलच्या ठिकाणी लावण्यात यावा. मालवण शहरातील पर्यटनाच्या दृष्टीतून सदर मागण्या विचारात घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे नितेश पेडणेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.