रवींद्र चव्हाण:आगामी काळात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाची नवी गंगा अवतरतांना दिसणार..
⚡सावंतवाडी ता.१९-: जगाला अभिमान वाटेल असं राष्ट्र अर्थात आपला भारत देश घडवायचा असेल आणि देशाला आगामी काळात जागतिक स्तरावर महासत्ता बनवायचं असेल तर पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी त्यांना संपूर्ण स्तरावर ताकद देऊन त्यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी येथे केले.
सावंतवाडी येथील ऐतिहासिक राजवाडा येथे संपन्न झालेल्या सावंतवाडी शहरातील बुद्धिजीवी लोकांच्या बैठकीत माजी मंत्री तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले पंतप्रधान मोदी आणि राज्यातील फडणवीस शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे काम सुरू आहेत. नरडवेसारखा कधीही न होऊ शकणारा प्रकल्प आता गतिमान होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासारखे प्रकल्प मार्गी लागले आहेत. आगामी काळात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाची नवी गंगा अवतरतांना दिसणार आहे.
केंद्रात मोदी शासनाला अकरा वर्षे पूर्ण झाल्यामुळे राजवाड्यातील सभागृहात बुद्धिजीवी लोकांची बैठक बोलावण्यात आली. यावेळी मोदी शासनाच्या काळात झालेल्या विविध योजनांबद्दल मान्यवरांनी माहिती दिली, दरम्यान यावेळी विचारपीठावर भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, रणजीत देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला आघाडीच्या संध्या तेरसे, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, पुखराज पुरोहित, प्रज्ञा ढवन, राजू राऊळ, राजेंद्र म्हापसेकर, बाबा मोंडकर, प्रमोद कामत, सुधीर आडिवरेकर, संदीप गावडे, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच इतर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचेही पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्य वक्ते तथा आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, मोदी शासनाच्या काळात सर्वसामान्य भारतीयांचा विकास झाला आहे. त्यादृष्टीने गेली अकरा वर्षे मोदी सरकारने अतोनात प्रयत्न केले आहेत. मोदी शासनाच्या काळातील अनेक योजना या सर्वसामान्य कुटुंबीयांना उभारी देणाऱ्या ठरल्या आहेत. असे सांगत त्यांनी आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यटन अशा विविध स्तरावरील सर्वसामान्य लोकांना उभारी देणाऱ्या योजनांचा उहापोह केला. तसेच शत्रू राष्ट्राला रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून ऑपरेशन ‘सिंदूर’सारखे अभिनव प्रयोग देखील अमलात आणले गेले असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले मोदी शासनाचा आतापर्यंतचा प्रवास हा सर्वसामान्य जनतेसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात अग्रेसर राहिला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात दूरदृष्टी असलेला पंतप्रधान भारताला लाभला आहे. याची आपण स्वतः इंग्लंड दौऱ्यात प्रचिती घेतल्या असल्याचे आमदार म्हात्रे यांनी नमूद केले.
दरम्यान यावेळी उपस्थित असलेल्या बुद्धीजीवी नागरिकांमधून सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर नाव असलेले व्यक्तिमत्व प्रा. डॉ. गणेश मर्गज, व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांसह अन्य मान्यवर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीबद्दल आपापले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजू शिरोडकर यांनी केले.