दत्ता सामंत: शिवसेना पक्षाचा ५९ वा वर्धापन दिन मालवणात उत्साहात साजरा..
⚡मालवण ता.१९-:
शिवसेना भाजप महायुती जरी असली आणि आम्ही शिवसेनेत जरी असलो तरी खास. नारायण राणे हे आमचे प्रेरणास्थान आहे. राणे जो निर्णय घेतील त्याप्रमाणे चालणारी आम्ही मंडळी आहोत, त्यामुळे जिल्ह्यातील येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खास. नारायण राणे महायुतीबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, भाजप व शिवसेनेचा समतोल राखूनच राणे निर्णय घेतील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी येथे बोलताना केले.
शिवसेना पक्षाचा ५९ वा वर्धापन दिन मालवण येथील आम. निलेश राणे जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, शहरप्रमुख दीपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, दिपलक्ष्मी पडते, सोनाली पाटकर, अंजना सामंत, मार्टिना फर्नांडिस शाम वाक्कर, मंदार लुडबे, भालचंद्र केळूसकर, महेश सारंग, भाई मांजरेकर आदी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले, शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना वाढत आहे. उबाठा सह इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण कुडाळ तालुक्यात आमदार निलेश राणे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन पक्ष प्रवेशाचा धमाका सुरु आहे. पक्ष प्रवेशाचे धमाके सुरूच राहतील. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सूत्रानुसार शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रामाणिक काम करत आहेत. यामुळे सर्वत्र शिवसेना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, असे दत्ता सामंत म्हणाले.
जिल्ह्यात विकासकामेही गतिमान होत आहेत. जिल्ह्यात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गतिमान विकास सुरु आहे. विकासाची ही गती अशीच कायम राहील, असेही दत्ता सामंत यांनी सांगितले.