सावंतवाडी उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची मळगाव येथील वीज ग्राहकांनी घेतली भेट…

सतत उदभवत असेलेल्या विजेच्या समस्यांबाबत केली सविस्तर चर्चा:येत्या आठ दिवसात समस्या सोडविण्याचे राक्षे यांनी दिले आश्वासन..

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील काही वीज ग्राहकांनी मळगावात हल्ली सतत उदभवत असेलेल्या विजेच्या समस्यांबाबत आज सावंतवाडी उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेतली. यावेळी वीज ग्राहकांनी मळगाव येथील विजेच्या विविध समस्यांबाबत राक्षे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.


मळगाव येथे गेले अनेक दिवस विजेचा सतत लपंडाव सुरु आहे. दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही विजेच्या समस्या वाढत आहेत. दिवसा वीज खंडित होते, परंतु अलीकडे दररोज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा सतत खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तसेच गावात बहुतेक ठिकाणी कमी दाबाचा वीज पुरवठा होणे, तसेच विजेचा दाब अचानक वाढणे, हे प्रकारही सुरु आहेत. तसेच वाकलेल्या वीजेच्या खांबांमुळे काही ठिकाणी विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. अशा अनेक वीज समस्या घेऊन मळगाव वीज ग्राहकांनी सावंतवाडी उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेतली. यावेळी वीज ग्राहकांनी नवीन सब स्टेशनची आवश्यकता, मळेवाड येथून येणारी वीज वाहिनी लवकरात लवकर जोडणी होणे, मळगाव बाजारपेठेतील दत्त मंदिर जवळील दोन खराब झालेले खांब, शिवाजी चौकातील वाकलेल्या स्थितीत असलेले दोन वीज खांब तसेच तेलकाटावाडी येथे पोल उभारणे तसेच मळगाव घाटातील जंगलमय भागातून रात्री अपरात्री वारंवार खंडित होणारी वीज, कमी दाबाचा वीज पुरवठा आणि या सर्व समस्यांचे योग्य निराकरण व्हायचे असेल तर लवकरात लवकर मळगाव पंचक्रोशीत सब स्टेशन उभारणे ही आवश्यक असल्याचे वीज ग्राहकांनी राक्षे यांना पटवून दिले. या सर्व विषयांवर उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्यावर बाजारपेठे व इतर आवश्यक त्या जागी नवीन लोखंडी खांब येत्या आठ दिवसात बदलून उर्वरित समस्या सुद्धा लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी दिले. सबस्टेशन बाबतच्या तांत्रिक बाबी दूर झाल्यास ते सुद्धा मार्गी लावून घेण्याचे आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अधिकाऱ्यांच्या सकारात्मक आश्वासनामुळे वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी वीज ग्राहक महेश खानोलकर, सहाय्यक अभियंता खांडेकर, जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, सचिव दीपक पटेकर, संजय तांडेल, प्रमोद राऊळ, राजन राऊळ, सहदेव राऊळ, स्वप्नील ठाकूर, राजू निरवडेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page