आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ रोजी ग्रामपंचायतीमध्ये विविध कार्यक्रम…

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची माहिती..

⚡ओरोस ता १९-: जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) -२ अंतर्गत शनिवार २१ जून २०२५ रोजीच्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांच्या सहकार्याने योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे.
११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ या आंतरराष्ट्रीय योग दिनास येत्या शनिवारी २१ जून २०२५ रोजी एक दशक पूर्ण करत आहे. या निमित्ताने देशात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे उपक्रम १० विशेष कार्यक्रमांमध्ये विभागलेले आहेत. या अनुषंगाने कार्यक्रम क्रमांक १ – योग संगम मध्ये योग संगम किंवा मुख्य आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम २१ जून २०२५ रोजी सकाळी ६:३० ते ७:४५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पंतप्रधान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश येथून राष्ट्रीय कार्यक्रमाशी समांतरपणे होणार आहे. योग संगम हे व्यापक जनसहभाग आणि मोठ्या प्रमाणावर योग प्रात्यक्षिकांची परंपरा पुढे नेण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती मधील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या किंवा परिसरातील आयुषमान आरोग्य मंदिर यांच्या सहकार्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांनी क्यूआर कोड १ स्कॅन करून योग संगमसाठी मानक कार्यप्रणाली माहिती व इतर संदर्भ सामग्री क्यूआर कोड २ स्कॅन करून मिळवता येईल.
कार्यक्रम क्रमांक २ – हरित योग मध्ये हरित योग उपक्रम पारंपरिक योगाभ्यासासोबत पर्यावरणीय शाश्वततेला देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यावर्षीच्या योग दिनाच्या कार्यक्रमांतर्गत योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांचा समावेश केला जाणार आहे. ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या या उपक्रमांना हरित योग अंतर्गत योग दिनाच्या कार्यक्रमात एकत्रितपणे राबविता येणार आहे. योग संगमसाठी मानक कार्यप्रणाली माहिती व इतर संदर्भ साहित्य क्यूआर कोड ३ स्कॅन करून प्राप्त करता येणार आहे.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात वॉश केंद्रित (पाणी, स्वच्छता व आरोग्य) दृष्टिकोन समाविष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून योग, आरोग्य व वॉश यांच्यातील संबंध अधोरेखित करता येईल. सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांनी “योग फॉर वेल बिइंग अँड वॉश ” या संमेलनाचे आयोजन अशा ठिकाणी करावे जिथे जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) – २ अंतर्गत मालमत्ता उपलब्ध आहेत. सर्व कार्यक्रम हरित योग किंवा योग संगम या मुख्य कार्यक्रमाशी सुसंगत असावेत. तसेच ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य व इतर जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन टप्पा २ संबंधित लाभार्थ्यांची बैठक आयोजित करणे, कार्यक्रमा आधी परिसर व पाणी स्वच्छता आरोग्य संबंधित पायाभूत सुविधा स्वच्छ करणे, महत्त्वाच्या जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन टप्पा २ मालमत्तांसमोर योग सत्र आयोजित करणे , समुदाय, योग क्रिया व योजनांची मालमत्ता दर्शविणाऱ्या स्पष्ट छायाचित्रांची नोंद केली जाणार आहे. दरम्यान या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग घेऊन व कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच या कार्यक्रमांची जिल्ह्याच्या सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी जिल्हावासियांना केले आहे.

You cannot copy content of this page