⚡मालवण ता.१९-:
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिशन या शासनमान्य संस्थेतर्फे देण्यात येणारा योग रत्न पुरस्कार मालवण तालुक्यातील चौके गावच्या सुकन्या व पुणे येथील मेडिकल योग थेरेपिस्ट दीपिका प्रकाश आंबेरकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. २२ जून रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित समारंभात करण्यात येणार आहे.
मूळ चौके गावच्या सुकन्या असलेल्या दीपिका आंबेरकर या सन २०१५ पासून पुणे येथे योग व मेडिकल योग या क्षेत्रात कार्यरत आहेत. योग प्रशिक्षिका व मेडिकल योग थेरेपिस्ट यासह अनेक पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. पुणे येथे काही वर्षे दीपिकाज् योग व थेरेपी क्लासेस च्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण तसेच सेवा दिली. त्याचप्रमाणे प्रशिक्षण वर्ग, शिबीरे तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून त्या सातत्याने कार्यरत आहेत. योग व मेडिकल योगाचे महत्व लोकांना पटवून देऊन त्याच्या प्रसाराचे कार्यही त्या करत आहेत. योग क्षेत्रातील दीपिका आंबेरकर यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना योग रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.