भाजपची महायुती असली तरी स्वतंत्र उमेदवाराची चाचपणी…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची सज्जता:रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती..

कुडाळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचं ठरलं असलं तरी भाजप कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असल्याचं दिसतंय. महायुती असली तरी भाजपने प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या स्वतंत्र उमेदवाराची चाचपणी केली असल्याच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी म्हटलं आहे. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपचे पक्ष प्रवेश थांबलेले नाहीत असं देखील देसाई यांनी सांगितलं.
कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये आज भाजप कुडाळ मंडलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांनतर रणजित देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला पदाधिकारी संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, संध्या तेरसे, बंड्या सावंत, रुपेश कानडे, निलेश परब, अदिती सावंत उपस्थित होते. यावेळी बोलताना रणजित देसाई यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सूतोवाच केले. श्री. देसाई म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्या असे आम्हाला वरून संकेत आलेले आहेत. त्या प्रमाणे आम्ही निवडणूका लढवू. परंतु प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघात आम्ही भाजप उमेदवारांची चाचपणी केली आहे. जिल्हाच परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आमचा प्रयत्न असेल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.
पक्षप्रवेशाबाबत बोलताना देसाई म्हणाले, पक्षप्रवेश आमच्याकडे देखील होतील. तशा प्रकारची व्यूहरचना केलेली आहे. भाजपचे संपूर्ण राज्यातील चित्र पहिले असता कालच नाशिकमध्ये मोठा पक्ष प्रवेश झाला. आज सांगली मध्ये झाला. सिंधुदुर्गात सुद्धा पक्षप्रवेश चांगल्या पद्धतीने होतील असा विश्वास श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. मधल्या काळात ज्या काही गोष्टी घडल्या त्या नाकारता येणार नाहीत. पण भाजपचे कार्यकर्ते आहेत ते अजूनही त्याच तडफेने काम करीत आहेत. माणसे जोडायचा प्रयत्न सुरु आहे. आमच्याकडची लोक गेली असतील तशी भाजपमध्ये सुद्धा काही लोक आली आहेत. कुडलमधले नगरसेवक, उपनगराध्यक्ष भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भविष्यात देखील भाजपमध्ये इनकमिंग चालू राहणार.
भाजपची १ + ११ अशी बूथरचना ९० टक्के पूर्ण झालेली आहे. तशाप्रकारे आम्ही ती प्रदेशाकडे सादर देखील केलेली आहेत. काही ठिकाणी अडचणी आहेत. पण त्या अडचणी दूर केल्या जातील आणि १०० टक्के बूथरचना पूर्ण करू असा विश्वास श्री. .देसाई यांनी व्यक्त केला.

कुडाळ मध्ये भाजपचे लवकरच कार्यालय

कुडाळ शहरामध्ये लवकरच भाजपचे नवीन कार्यालय सुरु होईल असे श्री. देसाई यांनी सांगितले. यासाठी मोक्याची जागा शोधणे सुरु होते. त्याची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आलेली आहे. लवकरच भाजपचं चांगले कार्यालय उभे राहील ज्याठिकाणी फक्त भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य नागरिकाला आपले प्रश्न घेऊन येता येईल असे श्री. देसाई म्हणाले.

You cannot copy content of this page