रणजित देसाई यांनी घेतला मोदी सरकारच्या कारकिर्दीचा आढावा:कुडाळ मंडलची बैठक संपन्न..
कुडाळ : २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं. त्याला यावर्षी ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. या अकरा वर्षात मोदी सरकारने देशातल्या जनतेसाठी ज्या ज्या योजना राबविल्या, जी कामे केली, परराष्ट्र धोरण, संरक्षण मजबूत केले. या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा कार्यक्रम सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे. विकसित भारताचा अमृत काळ, सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्ष असं या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावागावात जाऊन याचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत. त्यासाठी आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. कुडाळ येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते.
कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये आज भाजप कुडाळ मंडलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांनतर रणजित देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला पदाधिकारी संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, संध्या तेरसे, बंड्या सावंत, रुपेश कानडे, निलेश परब, अदिती सावंत उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणजित देसाई यांनी मोदी सरकारने गोरगरीब जनतेसाठी राबविलेल्या प्रमुख योजनांची माहिती दिली. त्या मध्ये मोफत अन्नधान्य योजना महत्वाची ठरली. त्यामध्ये देशभरातील ८१ कोटी लोकांना अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात आले. कोरोना काळात याचा लोकांना फार फायदा झाला. त्याच बरोबर पाणी टंचाई दूर करण्यासाठी हर घर जल योजना राबविण्यात आली. १५ कोटी पेक्षा जास्त घरापर्यंत हि योजना गेली. जगाने गौरव केलेले स्वच्छ भारत मिशन देशभरात राबविण्यात आले. राष्ट्रीय मागास आयोगाला दर्जा देण्यात आला. फिरत्या विक्रेत्यांसाठी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला. सुमारे ६४ कोटी रुपयांचे वाटप या माध्यमातून करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. कर्ज परतफेड केली. व्यवसाय वाढविला. पीएम मुद्रा योजनेतून ५५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. त्याचबरोबर स्टार्टअप, स्टँडअप या योजना देखील यशस्वीपणे राबविण्यात आल्या. त्याच बरोबर कोव्हीड काळात लस पुरवठा करण्यात आला. त्याच बरोबर परराष्ट्र धोरण मजबूत करण्यात आले. श्रीराम मंदिर उभारण्यात आले. उरी, पुलवामा, पेहलगाम या हल्ल्यांचे चोख प्रत्त्युत्तर देण्यात आले. भारताची अर्थ व्यवस्था जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर होती ती आता चौथ्या क्रमांकावर आली आहे. जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने भारताने पावले उचलली आहे. २०४७ मध्ये जेव्हा भारतीय स्वातंत्र्याची शंभर वर्ष साजरी केली जातील तेव्हा आपला देश विकसित देश व्हावा आणि जागितक अर्थव्यवस्थेत क्रमांक एक वर जावा असे नरेंद्र मोदी यांचे व्हिजन असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
मोदी सरकारचे हेच काम गावागावांमध्ये पोहोचविण्याच्या दृष्टीने बूथ स्तरावर नियोजन करण्यात आले असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. आजची बैठक हि त्याच साठी होती. त्या बैठकीत याचे बूथ स्तरावर नियोजन करण्यात आले.
दरम्यान जिल्ह्यात सभासद नोंदणी जानेवारीत सुरु झाली. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ पहिल्या क्रमांकावर तर कणकवली दुसऱ्या क्रमांकावर होता. कुडाळ मतदार संघात ऑनलाईन आन ऑफलाईन मिळून सुमारे ४२ हजार सभासद झाले असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
कुडाळ मध्ये भव्य रांगोळी प्रदर्शन
मोदी सरकारच्या अकरा वर्षाचं कार्य एका अनोख्या रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. कुडाळ मंडल भाजपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून जून महिन्याच्या अखेरीस मोदी सरकारच्या योजना दर्शवणारे भव्य जिल्हास्तरीय रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात येईल अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली. या रांगोळी प्रदर्शनात जिल्ह्यातील नामवंत रंगावली कलाकार सहभागी होणार आहेत.