नातेवाईकांच्या ताब्यात केले सुपुर्द
मालवण,दि प्रतिनिधी वराड पुलानजीकच्या कर्ली खाडी पात्रात बुडालेल्या रविकांत केशव पराडकर या पंचाहत्तर वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह आज सकाळी कर्ली खाडीपात्रात आढळून आला असून पराडकर यांचा मृतदेह सकाळी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण तालुक्यातील वराड भंडारवाडी येथील रविकांत पराडकर हे सकाळपासून घरातून बेपत्ता झाले होते. नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. त्यातच सकाळी रविकांत पराडकर हे वराड येथील ब्रिजचे ज्याठिकाणी काम सुरू आहे, त्याठिकाणी ते दिसून आले. यावेळी पराडकर हे पुलाच्या खाली कर्ली पात्रात उतरले होते. किनाऱ्यावर त्यांचे चप्पल, रुमाल स्थानिकांना दिसून आले. ही चप्पल पराडकर यांची असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याची माहिती कट्टा पोलिस दुरक्षेत्राच्या पोलिसांना दिली असता पोलिस कर्मचारी रुक्मांगद मुंडे, योगेश सराफदार, संतोष पुटवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांना एक चप्पल, रुमाल तसेच एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत आजाराला कंटाळून आपण आत्महत्या करत असून याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले होते . दरम्यान त्यांचा खाडी पात्रात काल रात्रौ उशिरापर्यंत शोध घेण्यात आला त्यानंतर शोधकार्य थांबविण्यात आले होते. आज सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू झाल्यानंतर सकाळी आठ वाजता ज्याठिकाणी पराडकर बुडाले होते त्याच्या पूर्वेला पन्नास मीटर वर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे याबाबतची माहिती पोलिसांनी दिली असून पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून पराडकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे
