राजकोट किल्ला परिसरात रात्रीच्या वेळी प्रेमीयुगुलांचा वावर…

राजकोटचे पावित्र्य जपले जावे ; शिल्पा खोत यांची मागणी..

⚡मालवण ता.१७-:
राजकोट येथील शिवपुतळ्याच्या परिसरात रात्रीच्यावेळी मद्यपी आणि प्रेमीयुगलांचा वावर होत असल्याने राजकोट किल्ला व शिवपुतळ्याचे पावित्र्य राखले जाणे आवश्यक असून यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी मालवण मधील शिवप्रेमी सौ. शिल्पा खोत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोकण प्रादेशिक मुख्य अभियंता शरद राजभोज यांच्याकडे केली.

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्यानंतर राजकोट येथे पाहणीसाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोकण प्रादेशिक मुख्य अभियंता शरद राजभोज यांच्याशी चर्चा करत शिल्पा खोत यांनी राजकोट परिसरातील समस्यांबाबत लक्ष वेधले. राजकोट किल्ला परिसरात शिवपुतळ्याबरोबरच जुने असे महापुरुष मंदिर असून त्यावर सर्वांची श्रद्धा आहे. मात्र शिवपुतळा परिसरात रात्रीच्यावेळी मद्यपी लोकांचा वावर सुरु असतो. तसेच रात्री प्रेमीयुगलांचाही वावर होत असून स्थानिकांनी अनेकदा त्यांना पकडले देखील आहे. अशा प्रकरांना आळा घालून शिवपुतळ्याचे पावित्र्य राखले जाणे आवश्यक आहे. शिवपुतळा परिसरात तातडीने सीसीटिव्ही लावण्यात यावेत तसेच महिलांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात यावा, अशी मागणी शिल्पा खोत यांनी केली. यावर बोलताना शरद राजभोज यांनी शिवपुतळा पूर्ण करणे आमच्यासाठी महत्वाचे होते. आता शिवपुतळा परिसरातील इतर सुविधा आणि शिवप्रेमींच्या मागणीनुसार इतर काही बाबींबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

You cannot copy content of this page