⚡सावंतवाडी ता.१०-: कळंगुट येथील 65 वर्षीय टॅक्सी चालक संजीवन वेंगुर्लेकर यांच्यावर बुधवारी रात्री मालपे येथे पाच ते सहा जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वेंगुर्लेकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी वेंगुर्लेकर यांची टॅक्सी कळंगुट ते बांदा-सावंतवाडीपर्यंतचे भाडे असल्याचे सांगून बुक केली होती. पाच भाडेकरूंसह टॅक्सी सावंतवाडीच्या दिशेने निघाली. मालपे-पेडणे येथे पोहोचताच या पाच हल्लेखोरांनी चालकावर हल्ला चढवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून टॅक्सी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, काल रात्री सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने एका चोरट्याला पकडण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. अन्य चोरटे दुचाकीवरून पसार झाले असून, त्यातील एक दुचाकी कणकवली येथे रस्त्याच्या बाजूला सापडली आहे. दुचाकी चोरीप्रकरणी सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. पेडणे पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
टॅक्सी चालकावर जीवघेणा हल्ला; एका संशयिताला अटक…
