⚡सावंतवाडी ता.१६-: शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ येथे आज शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषदेचे अधिकारी विजय सहरार, शिक्षण विभागाचे अधिकारी, माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेविका शर्वरी धारगळकर, समृद्धी विर्णोडकर, दीपाली सावंत तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दीपक केसरकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर भाष्य करताना सांगितले की, पूर्वीच्या ज्यू.के.जी. आणि सीनियर के.जी. ऐवजी थेट अक्षर ओळख सुरू करण्यात आली आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक स्तर उंचावेल. त्यांनी पुढे सांगितले की, मराठी माध्यमातून शिक्षण सुरू असून लवकरच इतर भाषांमधूनही शैक्षणिक योजना राबवण्याचा प्रस्ताव शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
शालेय पोषण आहारासाठी व शाळेतील सोयीसुविधांसाठी २० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तसेच ‘मिड डे मील’ दरवाढ आणि स्मार्ट टीव्ही योजना लवकरच राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आयुष्यात घडण्यासाठी शिस्तीची परीक्षा पहील्या दिवशी पासूनच घ्यावी, असे आवाहन आमदार केसरकर यांनी केले.
