नितीन वाळके :जिल्हा व्यापारी संघ पावसाळी पर्यटनाचे विविध उपक्रम राबविणार..
⚡मालवण ता.१२-:
यंदाच्या पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मे महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. पर्यटन व्यावसायिकांसाठी मे महिना हा पुढील पावसाळ्याच्या काळासाठी बेगमीच काळ असतो. पावसाळ्याचे तीन महिने पर्यटन बंद असल्याने तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकवेळा पर्यटन बंद ठेवावे लागत असल्याने आता पावसाळ्यातही पर्यटनाच्या संधी शोधणे महत्वाचे बनले आहे. त्यामुळे यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने पर्यटन व्यवसायिकांच्या साथीने पुढाकार घेऊन पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पावसाळी कालावधी व नैसर्गिक आपत्ती काळात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी येथील पर्यटन बारमाही सुरु राहण्याच्यादृष्टीने पावसाळी पर्यटन ही काळाची गरज आहे, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
मालवण येथील हॉटेल चैतन्य मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नितीन वाळके हे बोलत होते. यावेळी मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, बाळू अंधारी, गणेश प्रभुलकर, हर्षल बांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी नितीन वाळके म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्यटन व्यवसायिक, मच्छिमार, आंबा व्यावसायिक, व्यापारी यांसह इतर व्यवसायिकांवर आर्थिक संकट कोसळले. या नुकसानीचे परिणाम गणेश चतुर्थी काळात निश्चित पहायला मिळतील. कारण मे महिना हा या व्यवसायांसाठी बेगमीचा काळ असतो. हंगामातील ५० टक्के उलाढाल १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्याच्या काळात होते. पर्यटनच्या दृष्टीने तर हा अतिशय महत्वाचा काळ आहे. मात्र मे महिन्यात पाऊस पडल्याने येथील समुद्री पर्यटन, किल्ला होडी सेवा व इतर पर्यटन व्यवसाय ठप्प झाले. वर्षातील पावसाचे तीन महिने पर्यटन बंद असताना अशा नैसर्गिक आपत्तीमुळेही पर्यटन व्यवसायाचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता पावसाळी पर्यटन विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा व्यापारी संघाने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांची बैठक घेऊन पावसाळी पर्यटनासाठी काय काय करता येईल, कोणते उपक्रम घेता येतील यावर चर्चा करून तातडीच्या उपाययोजना व दीर्घकालीन उपाययोजना ठरविण्यात आल्या. याची अंमलबजावणी लवकरच सुरु करण्यात येणार आहे, असेही नितीन वाळके म्हणाले.
जिल्ह्यात पावसाळी पर्यटनालाही मोठा वाव आहे. यामध्ये जिल्हातंर्गत पर्यटन संधी देखील भरपूर आहेत. पर्यटन व्यावसायिकांसोबत झालेल्या बैठकीत काही तात्काळ उपाययोजना ठरविण्यात आल्या. यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमा ते नारळी पौर्णिमा या काळात येणाऱ्या पर्यटकांसाठी व्यापारी वर्गाकडून त्यांच्या दुकानात डिस्काउंट स्कीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये व्यापारी आपल्या दुकानातील वस्तू खरेदीवर पर्यटकांना काही टक्के सवलत देतील. तसेच दुसऱ्या पद्धतीत व्यापारी व पर्यटन व्यावसायिक आपापसात समन्वय करून डिस्काउंट कुपन योजना राबवतील. यामुळे पर्यटकांच्या मनात सकारात्मक तसेच सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन येत व्यापारी एकमेकांशी जोडले गेले आहेत, हे पर्यटकांवर बिंबवले जाईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील टूर ऑपरेटर यांच्याशी संपर्क करून श्रावण महिन्यात देवदर्शन उपक्रम राबविण्यात येईल. त्याच प्रमाणे जंगल दर्शन या संकल्पनेतही मोठा वाव असून ती राबविण्यासाठी प्रयत्न होतील. तसेच पावसाळ्यातील खेकडे पकडणे, हुक फिशिंग, पक्षी निरीक्षण, भात शेती मधील सफर, सह्याद्री पट्ट्यातील रिव्हर रफ्टिंग असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पावसाळी पर्यटनामध्ये सर्वांना सामावून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सायकल मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थी नंतर सप्टेंबर महिन्यात सागर ते सह्याद्री अशी मोटरसायकल रॅली काढून सह्याद्री मधील सुंदर जंगलांची माहिती घेता येईल, यां रॅलीत सुमारे ५०० ते ७०० मोटारसायकल चालक सहभागी होतील. तसेच मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा व नारळ लढविणे स्पर्धा हे कार्यक्रम देखील पर्यटनाच्या दृष्टीने पुढे आणणार आहोत. या सर्व उपक्रमांच्या प्रचार प्रसिद्धीची जबाबदारी जिल्हा व्यापारी संघ घेणार असून यासाठी युट्युबर्सची मदत घेण्यात येणार आहे, असेही नितीन वाळके म्हणाले.
तसेच दीर्घकालीन उपाययोजनामध्ये शासनाचे सहकार्य आवश्यक असणार आहे. यामध्ये गेले अनेक वर्षे राखडलेला सिवर्ल्ड प्रकल्प येत्या पाच वर्षात मार्गी लागवा अशी आमची शासनाकडे मागणी असून हा प्रकल्प झाल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला प्रचंड मोठा आयाम मिळेल. तसेच पावसाच्या दिवसात कोकणात येण्यासाठी वाहतुकीच्या रेल्वे मार्ग, महामार्ग, घाट रस्ते यांच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात कोकण रेल्वेची रो – रो सेवा कार ऑन व्हील च्या धर्तीवर राबवावी, यामुळे रेल्वेतूनच पर्यटकांच्या कार कोकणात दाखल होतील. तसेच चिपी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु करावे, पर्यटन गाईड नेमणे व त्यांना प्रशिक्षण देणे, जिल्ह्यातील अप्रकाशित पर्यटनस्थळे समोर आणणे, तसेच पर्यटनाच्या विविध प्रकारानुसार पर्यटनाची वेगवेगळी सर्किट तयार करणे, असे दीर्घकालीन उपाय राबविण्याचे ठरविण्यात आले, असेही नितीन वाळके यांनी सांगितले.