गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे राहा:सनातन संस्थेचे आवाहन..
⚡कुडाळ ता.११-: धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे.; कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्यांवरच असतो. आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेचे आनंद मोंडकर यांनी कणकवली येथे केले.
ते ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करत होते. यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरातील ७७ ठिकाणी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ठिकाणी साजरा करण्यात आला.
आनंद मोंडकर म्हणाले की, भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंकडून जी आक्रमणे होत आहेत, ती केवळ विस्तारवादासाठी नाहीत, तर हिंदु धर्माला संपवण्यासाठी होत आहेत. पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी ‘देश’ विचारून नाही, तर ‘धर्म’ विचारून गोळ्या झाडल्या. आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहासही हेच सांगतो की, जेथे जेथे धर्मांध माजले, तेथे त्यांनी हिंदूंना, हिंदूंच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य केले. आज आपण युद्धसदृश अवस्थेत आहोत. हे फक्त सीमांवरील लढाईसारखे वाटत असले, तरी खरे युद्ध हे धर्मयुद्धच आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
आपत्काळ सुरू झाला असल्याने सजग रहा, सावध रहा. शस्त्रासहित राहणे, संघटित राहणे गरजेचे आहे. आपण एक आहोत आणि हिंदु राष्ट्रात आहोत हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे अधिवक्ता समीर गव्हाणकर यांनी मालवण येथील कार्यक्रमात सांगितले.
हिंदूत्वनिष्ठ विवेक पंडित यांनी कुडाळ येथील कार्यक्रमात सांगितले की, मानसिक व शारीरिक ताकद वाढवून पूर्ण ताकदीनिशी धर्माच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. असे केले तर भारत पुन्हा विश्वगुरू होऊ शकतो. सनातन संस्थेचे संस्थापक परमपूज्य जयंत आठवले यांनी धर्माची पुनर्रचना, पुनर्बांधणी केली आहे. गुरुपरंपरा हे भारत भूमीचे वैभव आहे.
सावंतवाडीतील कार्यक्रमात स्वागत नाटेकर म्हणाले की, आज गावागावातून देशी गोवंश कत्तलीसाठी पाठवण्यात येत आहेत. सर्वात उपयुक्त आणि प्रेमळ असणारी कोकण कपिला ही देशी गाय नष्ट होऊ लागली आहे. आत्तापर्यंत ४०० हून अधिक देशी गोवंश वाचवण्याचे कार्य आमच्या सावंतवाडी गोरक्षक संघटनेच्या माध्यमातून आम्ही केले आहे. न्यायालयाने काही खटल्यामध्ये सुनावणी करून गोवंश बेकायदेशीर वाहतूक तसेच कत्तल करण्यासाठी येणाऱ्यांना दंड केला आहे. या कार्यासाठी आम्हाला. सनातन संस्था तसेच हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन मिळते,
समाजव्यवस्था उत्तम चालण्यासाठी चातुर्वर्ण्याच्या माध्यमातून सुयोग्य व्यवस्था सांगितली गेली. विश्वाशी असलेल्या संबंधांची जपणूक, पर्यावरणाची जपणूक, सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणूक हिंदू धर्मात केली जाते. अशी व्यवस्था असल्याने गावे स्वयंपूर्ण होती आणि भारतात सोन्याचा धूर निघत होता. मात्र हिंदुद्रोही राज्यकर्त्यांकडून याबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जातात. सर्वांगीण विकासाचा विचार धर्मात केला जातो. मनुष्य जन्मातच धर्मपालन करू शकतो. अन्यथा धर्माचरणाशिवाय आपले जीवन पशुसारखे आहे, असे प्रतिपादन प्रा. अक्षय परुळेकर यांनी कणकवली येथील कार्यक्रमात केले.
संतांची वंदनीय उपस्थिती
सावंतवाडी येथे झालेल्या कार्यक्रमास पानवळ (बांदा) येथील प.पू. दास महाराज, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, कुडाळ आणि सावंतवाडी येथे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची, तर कुडाळ येथे मुळदे येथील प.पू. घडशी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
गोरक्षक कृष्णा धूळपणावर यांचा सत्कार
प्रसंगी जीवावर उदार होऊन ५०० हून अधिक गोवंश वाचवणारे कोलगाव येथील गोरक्षक श्री. कृष्णा धूळपणावर यांच्यासह सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर मालवण येथील कार्यक्रमात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता पलाश चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.