अरुण वाघमारे:मालवणात ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संपन्न..
⚡मालवण ता.०९-:
ग्राहक हित जोपासण्याकरिता ग्राहकाला त्याचे हित आणि कायदा याची माहिती होण्यासाठी शाळा, कॉलेज स्तरावर शासनाकडून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. संघटनेच्यावतीने आम्ही नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यासाठी पुढाकार घेत आहोत. शासनानेही आम्हाला सहकार्य करून बंद खोलीतील कार्यक्रमांचे नियोजन करण्यापेक्षा सर्वसामान्य ग्राहकांना मार्गदर्शन होणारे कार्यक्रम आयोजित करावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र ग्राहक पंचायत संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी केले.
मालवण येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग शाखा, मालवण आयोजित एकदिवसीय जिल्हास्तरीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा मालवण येथील संस्कार केंद्र याठिकाणी संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मोहिते, डॉ. राहुल पंतवालावलकर, प्रताप बागवे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सहसचिव एस. एन. पाटील, जिल्हा ग्राहक आयोग माजी सदस्य कमलाकांत कुबल, व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, मालवण तालुका शाखा अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर ग्राहकगीत सादर करण्यात आले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून सहा विभागामध्ये उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून निवड झालेले सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा जिल्हा कार्यकारिणीतर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नितीन वाळके यांच्या हस्ते कमलाकांत कुबल यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले, प्राणी हा इतरांवर अवलंबून नसतो. तो स्वतः अन्न शोधतो. मानव हा इतरांवर अवलंबून असतो. त्यामुळे त्याची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे त्याला त्याचे हक्क माहिती असणे आवश्यक आहे. व्यापारीसुद्धा एक ग्राहकच आहे. तोही इतरांवर अवलंबून असतो, असेही ते म्हणाले.
या कार्यशाळेमध्ये सातबारा वाचन सर्जेराव जाधव यांनी केले. यावेळी ग्राहक पंचायतची रचना आणि कार्यपद्धती – प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यपद्धती-कमलाकांत कुबल व वफा खान, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार-सीताराम कुडतरकर, सजग विद्यार्थी ग्राहक अभियान-श्रद्धा कदम व ग्राहक देवो भवः – नितीन वाळके आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या ग्राहक प्रबोधन कार्यशाळेला जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच ग्राहक चळवळीविषयी जागरुक असणारी मंडळी उपस्थित होती.
