पार्टीसाठी गेलेल्या वृद्धाचा जाणवली तलावातील पाण्यात बुडून मृत्यू…

⚡कणकवली ता.०९-: जाणवली बौद्धवाडी येथील किसन भिकाजी पवार (वय ५१) यांचा जाणवली तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत जाणवली पोलीस पाटील मोहन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार काल किसन पवार यांच्यासह अन्य चौघेजण पार्टीसाठी जाणवली तलाव क्षेत्रात गेले होते. या दरम्यान किसन पवार हे धरण क्षेत्रातील असलेल्या खड्ड्यातील पाण्यात उतरले या दरम्यान त्यांचा बुडून मृत्यू झाला. मात्र ते घरी परतले नसल्याने त्यांची शोधाशोध झाली असता त्यांच्यासोबत गेलेल्या चौघांनी याबाबत संदिग्ध माहिती देत किसन हे बुडल्याचे सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र नातेवाईकांनी याबाबत अधिक ची माहिती घेत काल कुठे गेला होता? कुठे पार्टी केली? याबाबत अधिक माहिती घेतली असता जाणवली तलाव क्षेत्रातील मुख्य गेट पासून शोधाशोध करत त्या चौघांना घेऊन ज्या ठिकाणी या पाच जणांनी एकत्र जेवण केले तिथपर्यंत पोहोचले असता किसन हे तेथे पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. दरम्यान घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, पोलीस पाटील मोहन सावंत, दामू सावंत, संदीप सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. किसन पवार यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

You cannot copy content of this page