जिल्ह्यात १० पाणथळ जागांची साफसफाई…

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य..

कुडाळ : नुकताच संपूर्ण जगात दिनांक ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून १५० पेक्षा जास्त देशांनी ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा’ या थीम अंतर्गत साजरा केला गेला. यावर्षीच्या थीमचा उद्देश प्लास्टिकच्या वापरात कपात करून पर्यावरणीय प्रदूषण कमी करणे आणि प्लास्टिकच्या पुनर्वापरास प्रोत्साहन देणे असा आहे. हा उद्देश समोर ठेवून संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ व महाराष्ट्र जैवविविधता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वन विभाग सावंतवाडी, वन शक्ती फाउंडेशन, देशपांडे फाउंडेशन (हुबळी, कर्नाटक) महा एमटीबी मुंबई आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त सहभागातून जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ लाभलेले धामापूर तलाव, मालवण तालुक्यातील ऐतिहासिक पेंडूर व ठाकूरवाडी तलाव, जैवविविधतेने समृद्ध असे पाट तलाव, वेंगुर्ला तालुक्यातील निशांत तलाव, सावंतवाडी तालुक्यातील पाळणेकोंड तलाव, कणकवली तालुक्यातील ओझरम व ओसरगाव तलाव, ओरोस येथील दाबाचीवाडी तलाव आणि कुडाळ तालुक्यातील धार्मिक दृष्ट्या प्रसिद्ध वालावल तलाव, अशा १० पाणथळ जागांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक ४ मे २०२५ ते २ जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील १० पाणथळ जागांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेतून १०७४ किलो प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून परुळेबाजार ग्रामपंचायत यांच्या मदतीने परुळे बाजार येथे असणाऱ्या प्लास्टिक प्रक्रिया केंद्रामध्ये पुढील प्रक्रिया (रिसायकल) करण्यात आले. सदर स्वच्छता मोहिमेत मधून पाट तलावातून २००.१० किलो प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला तसेच धामापूर ११५.३६ किलो, दाबाचीवाडी १६०.१५ किलो, ठाकूरवाडी ५०.८५ किलो, पालनकोंड ८०.६० किलो, निशांतलाव ८.२६ किलो, वालावल १७४.२३ किलो, ओझरम ६५.२० किलो, ओसरगाव १३५. ८ किलो, पेंडूर १५.६२ किलो इतका प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला. जगभरात दरवर्षी ४३० दशलक्ष टनाहून अधिक प्लास्टिकचे उत्पादन केले जाते त्यापैकी दोन तृतीयांश हे मायक्रो प्लास्टिक असते आणि त्यामुळे अशा प्रकारे मायक्रो प्लास्टिक जैवविविधतेने समृद्ध अशा पाणथळ जागांमध्ये जमा होत राहिल्यास हे मायक्रोप्लास्टिक कालांतराने पाणथळ प्राण्यांच्या माध्यमातून किंवा अन्नसाखळीच्या माध्यमातून मानवापर्यंत पोहोचत आहे. भारतीय जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने जगभरात साजरा केला जातो शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपण, पर्यावरणीय शिक्षण यावर आधारित कार्यक्रम, स्वच्छता रॅली, स्वच्छता मोहीम, जनजागृतीचे कार्यक्रमाचे आयोजन करून पर्यावरण संवर्धन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ हे नेहमीच अशा प्रकारे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाचे कार्यक्रम व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करून पर्यावरणाबद्दल नेहमीच जागरूक राहत आले आहे. या स्वच्छता मोहिमेचे मुख्य आयोजक डॉ. योगेश कोळी तसेच प्रवीण सावंत व मयुरी चव्हाण यांनी संपूर्ण मोहिमेचे यशस्वी असे आयोजन करून मोहीम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या स्वच्छता मोहिमेसाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, प्रा. डॉक्टर अनंत लोखंडे, प्रा. प्रशांत केरवडेकर तसेच क. म. शि. प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जवळपास एक १ टना पेक्षा जास्त प्लास्टिक सदृश्य कचरा फक्त पाणथळ जागा मधून गोळा करून संत रावळ महाराज महाविद्यालयाने शैक्षणिक व सामाजिक स्तरावर आपले नाव लौकिक केले आहे. या मोहिमेस वनशक्ती फाउंडेशनच्या करिष्मा मोहिते, वन विभागाचे आर. एफ. ओ. संदीप कुंभार, सचिन पाटील, सदाशिव परब, देशपांडे फाउंडेशनचे सिद्धेश पालक व तेजस सावंत, सर्व ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य व महाविद्यालयाचे विद्यार्थी फयाज तालिकोट, गुरुनाथ कदम, साक्षी चव्हाण, वासुदेव सावंत, लौकिका, अभिषेक, रुद्रराज हे विद्यार्थी उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावला. ही पाणथळ स्वच्छता मोहीम पाणथळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये पाणथळांचे महत्त्व व त्यांचे संवर्धन याबद्दल जागरूकता वाढवणारी ठरली आहे. या स्वच्छता मोहिमेचे जागतिक स्तरावर ती अनुकूलन करून स्थानिक नागरिक शैक्षणिक संस्था एनजीओ आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्ग संवर्धनाच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल टाकले जाईल असा विश्वास डॉ. योगेश कोळी यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page