⚡मालवण ता.०५-:
समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ३०० व्या जयंतीनिमित्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने ओरोस येथील पत्रकार भवन येथे आयोजित अहिल्याबाई भीम पर्व कार्यक्रमात मालवण चौके गावचे सुपुत्र आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा संघटक विजय चौकेकर यांना मातृभूमी समाज सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमात कला, साहित्य , संमेलन, समाज प्रबोधन, जनजागृती, शिक्षण, उद्योग व समाज यांचे संवर्धन करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विजय चौकेकर हे गेली अनेक वर्षे सर्वसामान्य जनतेच्या मनातील अंधश्रद्धा व्याख्यानाच्या माध्यमातून दूर करण्यासाठी जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे काम करीत आहेत. तसेच जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती PIMC सिंधुदुर्ग यांच्या वतीने जादूटोणा कायदा प्रचारक म्हणून जिल्ह्यात व जिल्हा बाहेर जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान देत आहेत. तसेच गावागावात विद्यार्थी आणि जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याची दखल समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग यांनी घेत त्यांना मातृभूमी समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
यावेळी अभिनेते सुनील गोडबोले, समृद्धी प्रकाशनचे संचालक डॉ. बी . एन. खरात, उद्योजक एन .जी. खरात, दिग्दर्शक निर्माता संदीप राक्षे, पंचशील ट्रस्ट सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय खोटलेकर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते दशरथ शिंगारे, गीतकार अजय नाईक, भ.वि.ज.महासंघ कोल्हापूर प्रदेशाध्यक्ष यशवंत शेळके, आयपीएस उत्तीर्ण अधिकारी बिरदेव ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
