बाबी जोगी यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महावितरणची तत्काळ कार्यवाही..
⚡मालवण,ता.३०-:
स्वच्छ, सुंदर आणि चंदेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील चिवला बीचवर गेल्या १० दिवसांपासून धोकादायक स्थितीत पडलेला विजेचा पोल आणि चालू विद्युत केबल अखेर महावितरण विभागाने तातडीने हटवून त्या ठिकाणी नवीन पोल उभारला आहे. शिवसेना शहर प्रमुख बाबी जोगी यांनी महावितरण अधिकाऱ्यांना भेटून आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग आली असून स्थानिक मच्छीमार व पर्यटकांवरील मोठे संकट टळले आहे.
चिवला बीच हा पारंपरिक मच्छीमार रापण पातधारकांची मोठी लोकवस्ती असलेला भाग आहे. तसेच दरवर्षी लाखो पर्यटक या बीचला भेट देत असल्याने येथे नागरिक, मच्छीमार आणि पर्यटकांची कायम मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या दहा दिवसांपूर्वी एक माडाचे झाड कोसळल्याने विद्युत केबलसह वीज पोल मोडून थेट जमिनीवर पडला होता. गंभीर बाब म्हणजे, समुद्राच्या भरतीचे पाणी या पोल आणि जिवंत विद्युत केबलपर्यंत पोहोचत होते. त्यामुळे समुद्रात उतरणारे मच्छीमार, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचा जीव धोक्यात सापडला असून मोठा अपघात घडण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक मच्छीमार व नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख बाबी जोगी यांच्याकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून बाबी जोगी यांनी तात्काळ महावितरणच्या शहर कार्यालयात जाऊन शहर अभियंता श्री. मयेकर यांची भेट घेतली. “जमिनीवरील चालू विद्युत केबल तातडीने हटवून त्या ठिकाणी नवीन पोल उभारावा. महावितरण एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल करत “हे काम तातडीने न झाल्यास मच्छीमारांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयावर जोरदार आंदोलन छेडू,” असा इशारा बाबी जोगी यांनी दिला.
बाबी जोगी यांच्या आक्रमक भूमिकेनंतर वीज महावितरणचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गेल्या १० दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत असलेला पोल व चालू केबल उचलून त्या जागी नवीन पोल उभारण्याचे काम पूर्ण केले.
दरम्यान, श्री. जोगी यांनी विषयाची तातडीने दखल घेऊन प्रशासनाकडून काम करून घेतल्याने संभाव्य मोठा धोका टळला आहे. याबद्दल चिवला बीचवरील स्थानिक मच्छीमार, पातधारक व नागरिकांनी श्री. जोगी यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
