सोनुर्ली निगुडे मार्गावरील कोसळली मोरी पुलाची भिंत…

सावंतवाडी
नविन पुलाची वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलेले सोनुर्ली निगुडे मार्गावरील मोरी पुलांची भिंत काल झालेल्या मुसळधार पावसात कोसळली. यामुळेच रस्त्याला धोका निर्माण झाला असून पावसाळ्यात रस्ता खचून वाहतूक बंद होण्याची भिती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
सोनुर्ली निगुडे रस्त्यावर रेल्वे पुलानजीक असलेले मोरीपुल जीर्ण झाले आहे. या मार्गावर नव्याने डांबरीकरण करतांना या पुलाबाबत ग्रामस्थांनी बांधकामचे लक्ष वेधले होते. मात्र सदरचे काम बजेट मध्ये मंजुरीसाठी टाकल्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. दरम्यान त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपसरपंच भरत गावकर यांनी या पुलाची नव्याने मागणी केली होती. त्यावेळीसुद्धा थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारुन नेला होता. अखेर बांधकामने केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसात दिसून आला काल सदर पुलाची संरक्षण भिंत कोसळली यामुळे रस्त्याला धोका निर्माण झाला आहे सदरच्या पुलाला मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह असतो त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता खचून मार्ग बंद झाल्यास सोनुर्ली निगुडे गावाचा संपर्क तुटणार आहे. शिवाय सोनुर्ली गावातील ग्रामस्थांची शेती ही पुलाच्या पलिकडे असल्याने त्यांनाही मोठी अडसर निर्माण होणार आहे त्यामुळे बांधकाम विभागाने त्वरित या पुलाच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

चौकट
बांधकामचा पुर्णतः दुर्लक्ष
सोनुर्ली गावात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुर्णतः दुर्लक्ष करण्यात येत आहे. दोन गतवर्षी गावातील मुख्य रस्त्याचे काम करण्यात आले मात्र या रस्त्यावरील पुलाचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले नाही, आता पावसाळा आला आहे हे काम यावर्षी होणे कठिण आहे. तर मुख्य रस्त्यावरील गटारही साफ नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. एकूणच बांधकाम विभागाकडून सोनुर्ली गावावर पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप उपसरपंच भरत गावकर यांनी केला.

You cannot copy content of this page