⚡मालवण ता.१९-:
मालवण शहरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेकडून काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून मालवण देऊळवाडा सागरी महामार्ग नाका येथे लावलेला आणि पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून गणला गेलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला झाडांच्या पाना वेलींनी वेढले गेल्याने हा कॅमेरा वेलींच्या पानांमध्ये हरवून गेला आहे. सुरक्षेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यावरच झाडांच्या पाना वेलींनी अतिक्रमण केल्याने कॅमेरा देऊळवाडा नाक्यावर नजर ठेवणार कशी असा सवाल उपस्थित होत असून कॅमेऱ्यावरील वेली हटविण्याबाबत पोलीस यंत्रणा अथवा स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पर्यटन दृष्ट्या विकसित होणाऱ्या मालवण शहरातील वाहतूक व्यवस्था व अन्य हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून शहरांत काही मोक्याच्या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहे. यातील काही कॅमेरा अनेक वेळा बंद पडण्याचे प्रकारही होत असतात. मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा सागरी महामार्ग नाका येथील चौकात कसाल मालवण रस्ता तसेच सागरी महामार्ग येऊन मिळतो. अनेक वाहने याच रस्त्याने मालवण शहरात प्रवेश करतात. तसेच याठिकाणी आठवडा बाजारही भरतो. वाहतूकीची मोठी वर्दळ असलेल्या या नाक्यावरही सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. मात्र सद्यस्थितीत हा कॅमेरा वेलींनी वेढला गेला आहे. वेलींच्या पानांमध्ये हरवून गेलेल्या या कॅमेऱ्यामधून छायाचित्रण होत असेल का ? हा कॅमेरा देऊळवाडा परिसरात लक्ष कसे ठेवेल ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. वेलीत हरवलेल्या या कॅमेऱ्याबाबत पोलीस यंत्रणा व स्थानिक प्रशासन देखील अनभिज्ञ असून कॅमेऱ्यावरील वेली हटवून कॅमेरा कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
