कुडाळ : डॉ. अमूल पावसकर यांचा ‘अनुभूती’ हा कविता संग्रह सामाजिक भावनेपासून राजकीय भाष्य सुद्धा करतो, प्रेमापासून निसर्गापर्यंत बोलतो, मानवी नाती टिकवू पाहतो असे मत नामवंत कवी अजय कांडर यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. अमूल पावसकर यांच्या ‘अनुभूती’ या कविता संग्रहाचे प्रकाशन शनिवारी सायंकाळी कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात मान्यवरांच्या हस्ते झाले.त्यावेळी अजय कांडर बोलत होते.
डॉ. पावसकर यांचा हा चौथा कविता संग्रह असून यात वेगवेगळ्या दर्जेदार अशा एकूण २०० कविता आहेत. या प्रकाशन सोहळ्याला नामवंत कवी अजय कांडर, प्रमुख पाहुणे अनिरुद्ध यशवंत फडके, डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. हर्षदा देवधर, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, प्रफुल्ल वालावलकर, डॉ. अमूल पावसकर, डॉ. कादंबरी पावसकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. अजय कांडर आणि ऊपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात झाली. सर्व मान्यवरांच्या हस्ते अनुभूतीच प्रकाशन झाले. त्यावर डॉ. मुक्तनंद गवंडळकर, डॉ. संजय सावंत, डॉ राजेश नवांगुळ, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, प्रफुल्ल वालावलकर, डॉ गुरुराज कुलकर्णी, डॉ. हर्षदा देवधर, डॉ. मिलिंद कुलकर्णी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. डॉ. अमूल पावसकर यांनी लिहिलेल्या कविता या वेगवेगळ्या प्रकारच्या असून भाषा अत्यंत सोपी आणि साधी आहे. या कविता म्हणजे समाज मनाचा आरसा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
डॉ. अमूल पावसकर यांचा हा कविता संग्रह हा सामाजिक भावनेपासून राजकीय भाष्य सुद्धा करतो, प्रेमापासून निसर्गापर्यंत बोलतो, मानवी नाती टिकवू पाहतो असे मत नामवंत कवी अजय कांडर यांनी व्यक्त केले. मानवी नाती टिकवू पाहणारा हा कवी माणुसकीला अधिक महत्व देतो. चांगला कवी हा चांगला माणूस असतो. ती सगळी लक्षणे डॉ. पावसकर यांच्या स्वभावात आणि कवितेत दिसतात. म्हणूनच त्यांच्या अनुभूती या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यातून रसिक आले आणि उत्यांनी त्तम प्रतिसाद दिल्याचे अजय कांडर यांनी सांगितले. .
डॉ अमूल पावसकर म्हणाले, मनात साठलेल्या विचारांना अनुभवांना कवितांच्या रूपाने मोकळी वाट करून देण्याचा हा आपला प्रयत्न आहे. गेल्या चार पाच वर्षातीलच आपला हा प्रयत्न आहे. त्यात फार काही प्रेरकाचा अंगार नाही आहे. समाजाला काही शिकवण्याचा सुद्धा काही हेतू नाही. लहानपणापासून राष्ट्रसेवा दलाचे संस्कार असल्याने थोडासा समाजवाद, स्वामी स्वरूपानंदांचे अध्यात्मिक अधिष्ठान मनात आहे. त्याचबरोबर अतिशय चांगल्या साहित्यिक मित्रांचा मिळालेला सहवास, पत्नी डॉ. कादंबरी यांचे समृद्ध वाचन या सर्वातून अनुभव समृद्ध होत गेल्या. जाणिवा समृद्ध होत गेल्या आणि त्यातून हा काव्य प्रवास सुरु झाला. तो किती चांगला आहे किती वाईट आहे त्याचे समीक्षण समीक्षक करतील. पण याच्या बद्दलच्या ज्या काही चांगल्या वाईट प्रतिक्रया असतील त्या आवर्जून द्या असे आवाहन डॉ. अमूल पावसकर यांनी केले.
डॉ. अमूल पावसकर यांच्या अनुभूती या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. संजीव आकेरकर यांनी अत्यंत खुमासदार शैलीत केले. तर आभार डॉ. अमूल पावसकर यांनी मांडले. या प्रकाशन सोहळ्याला डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, डॉक्टर अमूल पावसकर यांचे कुटुंबीय आणि काव्य प्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अमूल पावसकर यांच्या ‘अनुभूती’ काव्य संग्रहाचे प्रकाशन…
