कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू…

१ मे पासून जिल्हा परिषदेचे अभियान :सर्व ग्रामपंचायतीने सहभाग घेण्याचे सीईओ खेबुडकर यांचे आवाहन..

ओरोस ता २९
जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. १ मे २०२५ पासून जिल्ह्यात ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून खत बनविण्यावर भर दिला जाणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली असुन जिल्हा वासियांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत मुख्य कार्यकारी अभिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखली घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील 741 गावात घनकचरा व सांडपाणी व्यस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. सांडपाणी व्यवस्थापना अंतर्गत सार्वजनिक शोषखड्डे, परसबाग व इत्यादी तसेच घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गांडूळ खत प्रकल्प, खतखड्डे. नाडेफ, प्लास्टिक कचरा संकलन केंद्र, इत्यादी उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यस्तरीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, गावात तयार केलेल्या नाडेपच्या माध्यमातून ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून खतनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
हे अभियान १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. अभियानाच्या पूर्वतयारी साठी 27 ते 30 एप्रिल दरम्यान घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. घरगुती व सार्वजनिक स्तरावर वर्गीकरण केले जाणार आहे. 29 ते 30 एप्रिल दरम्यान या मोहिमेची विविध माध्यमांचा वापर करीत प्रचार प्रसिध्दी करण्यात येईल. तसेच यशोगाथा प्रकाशित करून इतर गावांना प्रेरित करण्यात येणार आहे. अभियानाकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था, बचतगट महिला व शेतकरी गटांचा सहभाग घेऊन गावपातळीवर श्रमदान उपक्रम राबवून जनसहभाग घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी या मोहिमेचा शुभारंभ होईल. यावेळी स्थानिकस्तरावर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती राहिल. 1 ते 10 मे या कालावधीत गावातून संकलीत केलेला ओला कचरा नाडेपमध्ये भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मितीनंतर 15 सप्टेंबर 2025 पर्यंत नाडेप तयार झालेला खत उपसण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

चौकट
तालुक्याच्या सर्व गटविकास अधिकारी यांनी, पं.स. स्तरावर ग्राम पंचायत अधिकारी यांची कार्यशाळा, बैठक आयोजित करावी. ग्रामपंचायत अधिकारी यांनी बैठक घेऊन सर्व ग्रामस्थांना माहिती द्यावी. तसेच गावात दवंडी द्यावी. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, सर्व कार्यालयाच्या सूचना फलकावर माहिती प्रसारित करण्यात याव्यात अशा सूचना जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन सर्व ग्रामपंचायतीना देण्यात आल्या आहेत.

चौकट
“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” या मोहिमेची पडताळणी तालुका स्तरावरून गटविकास अधिकरी, विस्तार अधिकारी, जिल्हा सल्लागार, तालुकास्तरावरील समन्वयक व गट समन्वयक ओल्या कऱ्यापासून भरलेल्या नाडेप खड्डयाची पडताळणी करणार आहेत.

चौकट
कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू, या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक गावाने सक्रिय सहभाग घ्यावा. प्रत्येक कुटुंबाने घरामध्ये ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करावे. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत निर्मिती करावी तर प्लास्टिक किंवा इतर न कुजणारा सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठी देण्यात यावा. आपले गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

फोटो:- रवींद्र खेबुडकर

You cannot copy content of this page