बिडवलकर मृत्यू प्रकरणी ३ संशयितांच्या कोठडीत वाढ…

एका संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी.

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर याच्या खून प्रकरणी चार पैकी सिद्धेश शिरसाटसह ३ संशयित आरोपींची १५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीची मुदत वाढवून दिली तर चौथा संशयित अमोल शिरसाट याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कुडाळ न्यायालयाने दिले आहेत.
चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याच्या खून प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले सिद्धेश शिरसाट (रा.कुडाळ), अमोल शिरसाट,रा. कुडाळ), सर्वेश केरकर (सातार्डा) व गणेश नार्वेकर (माणगाव) या चौघांची पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपली. यावेळी होती, त्यांना न्यायालयात आज हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील मेघा परब यांनी सरकारी पक्षाच्या वतीने आपली बाजू मांडताना सांगितले की, संशयित आरोपी यांनी या माराहाण प्रकरणी वापरलेला पाईप पोलिसांनी जप्त केला आहे. यातील संशयित यांनी हाडे व राख फेकलेल्या ठिकाणाचा पंचनामा केला आहे. पोलीसांना काही पुरावे हाती लागले आहेत . या अनुषंगाने संशयिताचे आवाजाचे नमुने आता घ्यायचे आहेत. प्रकाश बिडवलकर याच्या मृतदेहाची हाडे व राख आता मिळणे शक्य नसले तरी या अपहरण व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना कोणी कोणी साथ दिली,याचा तपास करायचा आहे.यातील अन्य साथीदार व साक्षीदार यांच्याकडे तपास करायचा आहे. या गुन्ह्यात काही वाहने वापरली आहेत ती वाहने ताब्यात घ्यायची आहेत. यातील मयताचा मोबाईल हा तपास कामातील एक सर्वात मोठी मदत ठरणारा आहे. तो मोबाईल ताब्यात घ्यायचा आहे. यातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याचा मोबाईल त्याने ताब्यात दिलेला नाही. तो जप्त करायचा आहे. प्रकाश बिडवलकर याला मारायचा कट कुठे रचला? हे संशयितांनी सांगितलेले नाही. यातील संशयित सिद्धेश शिरसाट याला पोलीस कोठडी मिळताच प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्याकडे पहिल्या दोन दिवसात चौकशी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. तसेच तो तपासात पोलिसांना सहकार्य करत नाही. रूग्णालयात दाखल असताना अनेकजण अप्रत्यक्षपणे सहकार्य करत असल्यास त्यांचाही तपास करता यावा यासाठी सात दिवस पोलीस कोठडीची मागणी केली तर यातील चौथा संशयित अमोल शिरसाट यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडीचीही मागणी सरकारी वकील मेघा परब यांनी केली.
याबाबत संशयित आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड विवेक मांडकुलकर यांनी सांगितले की, ही घटना प्रथम २७ फेब्रुवारी रोजी (एका वृत्तपत्रातून) उघड झाली असताना पोलीसांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही असे म्हणणे योग्य नाही. २७ फेब्रुवारी पासून सर्व पुरावे असताना खुनाचा गुन्हा आताच का दाखल होत आहे? त्यावेळी हा विषय उजेडात आणणारे यातील खरे साक्षीदार आहेत. अशा स्थितीत पोलीसांनी याकडे दुर्लक्ष केले. गुन्हा घडून एवढी वर्षे व तो उघड होऊन एवढे दिवस झाले असतील तर आताच गुन्हा दाखल का केला? यामुळे याता जाणीवपूर्वक कोणाला तरी अडकावयचा प्लॅन तयार केला आहे. प्रकाशचा मृतदेह जाळला तर त्याचा पुरावा पाहिजे. आवाज नमुना साठी संशयित कधीही सहकार्य करण्यास तयार आहेत, घटना घडल्यानंतर दोन वर्ष काहीच नाही. यानंतर अचानक जाग का येते? दबाव आणून कोणीतरी ही केस तयार केली आहे . असा युक्तिवाद करत पोलीस कोठडीत पंख्याची सोय नसल्याने संशयितांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा युक्तिवाद केला.
तर ॲड. राजीव बिले यांनी आपल्या संशयितांकडून पोलीसांना तपासात सर्व सहकार्य केले आहे. मारण्यासाठी वापरलेले प्लॅस्टिक पाईप साहित्यही दिले आहेत. त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. असा युक्तिवाद केला .

एका व्यक्तीला जाळून आरोपी मोकाट फिरत होते – गायकवाड

प्रकाश बिडवलकर अपहरण व खुन प्रकरणातील संशयित आरोपींची लोकांमध्ये दहशत असल्याने दोन वर्षे कोणीही तक्रार द्यायला पुढे आले नाही.मयताचे नातेवाईक निराधार आहेत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. जेथे प्रकाशला जाळण्यात आले तेथील काही साक्षीदार तपासायचे आहेत. दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीला जाळून ही माणसे समाजात मोकाट फिरत होती. त्यामुळे माणसे निर्ढावलेली आहेत . त्यांना पैशाची गुर्मी व मस्ती आहे. नग्न करून व्हिडिओ करणे ही विकृती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला काळींमा फासणारी ही घटना आहे. त्यामुळे न्यायालयाने या आरोपीकडून अजून पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी तपासी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमसेन गायकवाड यांनी केली.

You cannot copy content of this page