एसटी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी..
कणकवली : कणकवली – कुंभवडे एसटी बस आज न सोडल्याने कुंभवडे विद्यालयातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस रोखून धरल्या. एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर विद्यार्थी व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बस रोखून धरल्यामुळे अन्य मार्गावर जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक कोलमडले. अखेर कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी कुंभवडेकडे जाणारी बस उपलब्ध दिल्यानंतर रोखलेल्या बस मार्गस्थ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाट मोळकी करून दिली. या प्रकारामुळे कणकवली बसस्थानक काही काळ वातवरण तंग झाले होते. कणकवली आगारातून कणकवली-कुंभवडे ही बस नियमित सोडली जाते. या बसमधून कुंभवडे विद्यालयातील शिकणारे विद्यार्थी ये-जा करीत असतात. कुंभवडे विद्यालयाचे विद्यार्थी शनिवारी सकाळ पासून कणकवली-कुंभवडे बस पडकण्यासाठी स्थानकात आले होते. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक व शिक्षक उपस्थित होते. सदर बस बसस्थानकातून नियमित सकाळी ६ वाजता सुटते. मात्र, आज ही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बसेस रोखून ठरल्या. त्यामुळे अन्य मार्गांवर जाणाऱ्या बसेस वेळेत न सुटल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अखेर विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर एसटीच्या अधिकाऱ्यांनी कुंभवडेकडे जाण्यासाठी तात्काळ बस उपलब्ध करून दिली. त्यानंतर रोखलेल्या बसेस मार्गस्थ होण्यासासाठी विद्यार्थ्यांनी वाट मोळकी करून दिली. दरम्यान, एसटी नियमित सुटणाऱ्या गाडयांचे नियोजन काल काही कारणांस्तव करता आले नाही. त्यामुळे कुंभवडे-कणकवली ही बस वेळेत सुटली नाही. यापुढील काळात सदर बस वेळेत सोडण्यात येईल, असे आश्वासन गायकवाड यांनी दिले. गेले काही दिवस दर शनिवारी आगारातून सकाळी ६ वाजता सुटणारी कुंभवडे-कणकवली बस वेळेत सुटत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचा बस अभावी खोळंबा होत आहे. बस नियमित सोडण्याबाबत एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्या सुधारणा झाली नाही.त्यामुळे आज बस रोखण्याचा पवित्रा घ्यावा लागला. बस वेळेत सुटली नसल्याने आमचा पेपर देण्यासाठी वेळेत पोहोचत न आल्याने चुकला आहे, याला एसटीचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पोलीस विनोद सुपल यांच्यासह पालक उपस्थित होते.
