मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर:जिल्हा परिषदेत जागतिक आरोग्य दिन साजरा…
ओरोस ता ७
आरोग्य ही खरी संपत्ती असून आपल्या, आपल्या कुटंबाच्या व समाजातील इतर सर्व घटकांचे आरोग्य निरोगी राखणेसाठी कटिबध्द होवे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमात बोलताना केले.
7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ची स्थापना झाली व 7 एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येवू लागला. जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी आरोग्य विषयक थीम निश्चित करते व त्यानुसार विविध आरोग्य विषयक जगजागृतीपर कार्यक्रम राबविणेत येतात. 2025 करिता ‘आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य’ असे घोषवाक्य आहे. या निमित्त आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर उपस्थित होते. सर्वप्रथम धन्वंतरी मुर्तीचे पूजन करुन तदनंतर हिरकणी व निर्मयी हे महिलांसाठी समुपदेशन, विविध आरोग्य सेवा सेवा देणा-या कक्षाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरोग्य विभाग आयुष कक्षा मार्फत हर्बल गार्डन ही नावीन्य पुर्ण संकल्पना जिल्हा परिषदेच्या आवारात तयार करण्यात आली आहे. या गार्डनचे उद्घाटन श्री. खेबूडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. कृपा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
