किरण चव्हाण यांनी वाचविले प्राण : पिल्लावर पक्षीप्रेमी उदय रोगे यांनी केले उपचार
*💫मालवण दि.२४-:* मालवण देऊळवाडा येथील आडारी रोडवर टिकेल ब्ल्यू या पक्षाचे पिल्लू एका कुत्र्याच्या तावडीत सापडले होते. किरण चव्हाण यांनी त्या कुत्र्याच्या तावडीतून या पिल्लाची सुटका करून त्याला पक्षीप्रेमी उदय रोगे यांच्या ताब्यात दिली. एका पंखास थोडी दुखापत झालेल्या या पिल्लावर रोगे यांनी योग्य ते उपचार केल्याने या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. चव्हाण व रोगे यांच्या दक्षतेमुळे या टिकेल ब्ल्यू पक्ष्याच्या पिल्लाला जीवदान मिळाले आहे. भारतातील विशेष पक्षातील हा टिकेल ब्ल्यू पक्षी आहे. एखाद्या पोखरात हा पक्षी आपले घरटे बांधून राहतो. मालवण आडारी रोड येथे या पक्ष्याचे एक पिल्लू कुत्र्याच्या तावडीत सापडले असता किरण चव्हाण यांनी त्याची सुटका केली. चव्हाण यांनी मालवणचे संग्रहकार व पक्षीप्रेमी उदय रोगे यांना पाचारण केले. रोगे यांनी हे जखमी पिल्लू ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती आयुर्वेदिक औषध उपचार पद्धती केली. हा पक्षी व्यवस्थित होण्याची खात्री झाल्यानंतर या पक्षास निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येईल. हे पिल्लू देऊळवाडा आडारी येथीलच प्रफुल्ल देसाई यांच्या घरासमोरील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे, असे रोगे यांनी सांगितले. सध्या लॉकडाऊन काळात घराबाहेर पडणे म्हणजे जीवघेणे ठरले असले तरी आपल्या सभोवती पशु पक्षांना काहीना काही खाद्य पाणी देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आपणही आपल्या सभोवताली असणाऱ्या पशुपक्ष्यांना अन्न-पाणी रोज मिळेल याची काळजी घ्यावी. तसेच जखमी पक्षी आढळल्यास त्याच्या मदत कार्यासाठी गरज लागल्यास 9049394516 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उदय रोगे यांनी केले आहे.
