सशक्त हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी छञपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचले पाहीजेत…!

निलेश सावंत ; बांदा शहरात स्मरण मुकपद यात्रा…

⚡बांदा ता.०१-: छत्रपती संभाजी महाराज यांना झालेल्या यातनांचे स्मरण करत सशक्त हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी महाराजांचे विचार हे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले पाहिजेत. महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मरक्षक व स्वराज्यरक्षक होते. स्वराज्यनिष्ठेसाठी त्यांचे बलिदान हे न विसरता येण्यासारखे आहे. आताच्या पिढीने त्यांचे विचार आचरणात आणून त्यांची निष्ठा जपावी असे प्रतिपादन हिंदू एकता मंचाचे निलेश सावंत यांनी येथे केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास समाप्ती निमित्त त्यांच्यावर झालेल्या यातनांचे स्मरण करण्यासाठी बांदा शहरात स्मरण मुकपद यात्रा काढण्यात आली. श्री बांदेश्वर मंदीर ते छत्रपती संभाजी चौक, मोर्येवाडा, तेली तिठा, उभाबाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हॉस्पिटल कट्टा कॉर्नर येथून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गडगेवाडी येथे स्मरण यात्रेची सांगता करण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदा दिवशी फितूरीने पकडले होते आणि पकडल्या क्षणापासून ते फाल्गुनी अमावस्या पर्यंतच्या या महिन्याभरात त्यांचा अतोनात छळ करण्यात आला होता. या काळात छत्रपती संभाजी महाराजांनी यातना सहन करत आपला स्वराज्यधर्म सोडला नव्हता. त्यांनी भारतमातेसाठी, देव, देश, धर्मासाठी बलिदान दिले.
त्यांच्यावर झालेल्या यातनांचे स्मरण करण्यासाठी शहरात मूकपदयात्रा काढण्यात आली. या यात्रेत कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता, आवाज न करता, पायात चप्पल न घालता व शांततेत स्मरण यात्रा काढण्यात आली. या यात्रेत बांदावासिय तसेच परिसरातील महिला, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page