हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत हडपिड स्वामी समर्थ मठात प्रकटदिन सोहळा संपन्न…

श्री स्वामी समर्थ मालिका फेम कलावंत अक्षय मुडावदकर यांची प्रमुख उपस्थिती..

⚡देवगड ता.०१-:
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचा सहावा वर्धापन दिन व अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या विशेष प्रसंगी श्री स्वामी समर्थ मालिकेत स्वामींची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते अक्षय मुडावदकर यांची उपस्थिती भाविकांसाठी आनंददायक ठरली.
रविवार, ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता शिरगाव पावणादेवी मंदिर ते श्री स्वामी समर्थ मठ हडपिड पर्यंत पालखी मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पुणे जेजुरी गड, कडेपटारावरील श्री देव मल्हारी मार्तंड यांच्या सत्वांचे आगमन झाले.या सोहळ्याच्या निमित्ताने हडपसर येथील श्री स्वामी समर्थ मठात पुणे जेजुरी गड कडेपठारावरील श्री देव मल्हारी मार्तंड यांच्या “येळकोट येळकोट जय मल्हार” देखाव्याचे उद्घाटन अभिनेते अक्षय मुडावदकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे आणि संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या हस्ते त्यांचा तसेच जेजुरी गड पठारावरील आलेल्या ट्रस्टींचा सन्मान करण्यात आला.

   प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने स्वामींच्या गाभाऱ्यात फळांची आकर्षक आरास गाभाऱ्याभोवती विद्युत रोषणाई तसेच मंदिर परिसरातही विद्युत रोषणाई   करण्यात आली होती.सोमवार पहाटेपासून श्री गणेश पूजन, पादुकापूजन,अभिषेक, होमहवन, श्री सत्यनारायण महापूजा यांसह विविध धार्मिक विधी पार पडले. सकाळी १० वाजता लघुरुद्र कुंकूमार्चन, दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा मोठ्या उत्साहात शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दुपारी १२:३० वाजता महाआरती, त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता गोंधळ, संध्याकाळी सुस्वर भजने, रात्री १० वाजता "कोकणचा साज संगमेश्वरी बाज" या तुफानी विनोदी लोकनाट्याने सोहळ्याची सांगता झाली.

स्वामीभक्तांसाठी भावनिक क्षण

या प्रकट दिनी विशेष म्हणजे टीव्हीच्या स्क्रीनवर दररोज पाहिल्या जाणाऱ्या स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर प्रत्यक्ष पाहण्याचा भक्तांना योग आला. त्यामुळे त्यांच्यासोबत फोटोसेशनसाठी मोठी गर्दी झाली. भक्तगण त्यांच्या भेटीने भारावून गेले.

या सोहळ्यास देवगड पोलीस निरीक्षक, राजकीय पदाधिकारी,नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भक्तगण या सोहळ्याच्या निमित्ताने हडपीड येथे आले होते. उपस्थित मान्यवरांचा मठाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीडच्या कार्यकारिणी विश्वस्त मंडळ, पदाधिकारी सदस्य आणि देवगड तालुक्यातील भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

You cannot copy content of this page