सापडलेल्या मासळीचा लिलाव करीत नौका ठेवली सर्जेकोट बंदरात..
⚡मालवण ता.३१-:
मालवणसह जिल्ह्याच्या किनारपट्टीवर बेकायदा एलईडी लाईट व पर्ससीन मासेमारी होत असून याबाबत दोन दिवसापूर्वी पारंपारिक मच्छिमारांनी आक्रमक भूमिका घेत मत्स्य विभागाला आंदोलनाचा इशारा दिला असतानाच महाराष्ट्र राज्य जलधी क्षेत्रात मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर ११ सागरी मैल अंतरातील समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईटव्दारे मासेमारी करणाऱ्या गोवा येथील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. ही नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. तसेच या नौकेवरील एलईडी लाईटचे साहित्य जप्त केले असून नौकेत सापडलेल्या मासळीचा लिलाव करण्यात आला.
याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवार ३० मार्च रोजी रात्री सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रविंद्र मालवणकर, (मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण) हे समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका बलाका जेजू (नों. क्र. आयएनडी जीए ५ एमएम २३५१) महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर ११ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना दिसून आली. सदर नौका मत्स्य विभागाने ताब्यात घेतली. या नौकेवर नौका तांडेलसह ३० खलाशी होते. ही नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. या नौकेत वागटी, सुरमई, बांगडा इत्यादी प्रकारचे मासे सापडून आले. या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरु होती. तसेच नौकेवर एलईडी लाईट पुरवणारी अंदाजे ६ ते ७ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करून उपकरणे जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत.
अंमलबजावणी अधिकारी रविंद्र मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण यांनी पोलिस कर्मचारी पाटोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असून सदर नौकेस ७ ते ८ लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार असून पुढील कारवाई होणार आहेत.
