कुडाळ नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ…

सभाशास्त्र धाब्यावर ; वैयक्तिक टीका टिपणीवरच भर..

कुडाळ : कुडाळ शहराचा विकास करायचा आहे. आम्ही कुडाळ नगर पंचायतीचे विश्वस्त आहेत. विकासाच्या कोणत्या गोष्टीला आमचा विरोध नाही, पण चुकीच्या गोष्टी आम्ही होऊ देणार नाही. असा सूर आज झालेल्या कुडाळ नगर पंचायतच्या आज झालेल्या सर्व साधारण सभेत सगळ्याच नगरसेवकांकडून आळवला गेला. पण सर्व नगरसेवकांची हीच भूमिका असून सुद्धा कोणत्याही गोष्टीवर नगरसेवकांचे एकमत मात्र होऊ शकले नाही. सांडपाणी प्रक्रिया केंद्रावरून तर सभेत मोठा गदारोळ झाला. तीच गोष्ट भंगसाळ नदीकाठच्या तीन गुंठे जमीनीवर घाट बांधायचा, उद्यान उभारायचे कि त्यासाठी आलेला निधी परत गेला तरी चालेल पण यातील काहीच होऊ द्यायचे नाही, यावरच नागरसेवकात मतमतांतरे दिसून आली. सभाशास्त्र गुंडाळून ठेवून सत्ताधारी दोन गटांचा
वैयक्तिक टीका टिपण्णी वरच जास्त भर असल्याचे चित्र आज सभागृहात दिसून आले.
कुडाळ नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक संध्या तेरसे, अक्षता खटावकर, आफरीन करोल, श्रुती वर्दम, श्रेया गवंडे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, सई काळप, ज्योती जळवी, विलास कुडाळकर, ऍड. राजीव कुडाळकर, निलेश परब, मंदार शिरसाट, अभिषेक गावडे, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, मुख्याधिकारी अरविंद नातू आणि नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
सांडपाणी प्रक्रिया केंद्रावरून सभेत फार मोठा गदारोळ झाला. कुडाळ भंगसाळ नदीच्या काठी बंधाऱ्याच्या बाजूला असलेल्या गणेश घाटाजवळच्या जमिनीत हे केंद्र प्रस्तावित आहे. त्याठिकाणी शहरातील सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया केली जाणे अपेक्षित आहे. ती जमीन खासगी मालकीची आहे. आणि जागा मालक ती जमीन विकायला तयार आहे. पण त्याची किंमत तो अडीज लाख रुपये गुंठा सांगतो. ती किंमत शासकीय दरापेक्षा जास्त असल्याने जागा पाहून आणि किमतीबाबत तडजोड करून ती जागा घ्यावी असे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्यासहित काही नगरसेवकांचे म्हणणे होते. तर त्या जागेची पाहणी करून ती जागा योग्य आहे का, त्यावर केंद्र होऊ शकते का ? ती जागा कोणत्या झोन खाली येते का ? याची शहानिशा करून मग विशेष सभा घेऊन त्यात हा विषय ठेवावा असे नगरसेविका संध्या तेरसे आणि काही नगरसेवकांचे म्हणणे होते. त्यावरून मोठा गदारोळ झाला.
प्रकल्प होणे आवश्यक आहे. प्रकल्पाला आमचा विरोध नाही. पण प्रथम जागा पाहूया, ही जागा पाणथळ अगर ब्लुझोन मध्ये असेल तर त्याबाबतच्या बांधकामाचे नियम अटी शर्ती पाहून पुढील सभेत चर्चा करून निर्णय घेऊया, असे संध्या तेरसे यांनी सुचित केले. त्याला निलेश परब, उदय मांजरेकर, किरण शिंदे, सई काळप, अक्षता खटावकर, श्रेया गावंडे, ज्योती जळवी आफरीन करोल यांनी समर्थन दिले. मात्र याला नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळे, श्रुती वर्दम, विलास कुडाळकर, ऍड राजीव कुडाळकर, अभी गाव,डे गणेश भोगटे यांनी विरोध केला. जागेची पाहणी करून दराबाबत तडजोड करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी भूमिका घेत जागा खरेदी करण्याची मागणी केली. मात्र याला किरण शिंदे, निलेश परब यांनी जोरदार हरकत घेत पूर्ण अभ्यास करा, जागेची पाहणी करून नंतर खास सभा बोलावून निर्णय घ्या, अशी भूमिका मांडली. या दरम्यान ऍड राजीव कुडाळकर आणि उदय मांजरेकर, निलेश परब यांच्या जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
नगरपंचायतीने यापूर्वी नाबरवाडी, एमआयडीसी येथे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जागा घेतल्या. मात्र त्या जागांमध्ये अनाठायी पैसा गुंतवला. त्या जागांचा विनीयोग झाला नाही याकडे किरण शिंदे व उदय मांजरेकर यांनी लक्ष वेधले. आता घेणारी जागा प्रकल्पासाठी योग्य आहे का हे पहा व मगच तसा निर्णय घ्या असे सुचित केले. अशातच नगरसेवक उदय मांजरेकर व अभी गावडे यांच्यात तडजोड, जागा खरेदी व दर तडजोडीच्या शब्दावरून जोरदार वादंग झाला. वैयक्तिक टीका टिपणी करण्यात आली. सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही काय केलात, तर दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी तुम्ही काय केलात, या विषयावरून वाद रंगला. हा विषय पूर्ण बैठकीत घेऊन पुढील निर्णय घेण्यात यावा नाहीतर ठराव मतदानासाठी टाकावा, असे संध्या तेरसे यांनी सांगितले. मात्र ठराव व मतदान घेण्यात आले नाही. ज्योती जळवी व गणेश भोगटे यांच्यातही वाद झाला.
यापूर्वी कर्ली नदी जवळील कुडाळ भंगसाळ काठावरील आठ गुंठे जागेत गार्डनसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आमदार वैभव नाईक यांनी सदर काम मंजूर करून निधी सुद्धा आणला होता. मात्र तेव्हाच्या सत्ताधारी गटाने नदीकाठ पूर क्षेत्र व अन्य कारणे देऊन सदर कामाला विरोध करण्यात आला होता. मात्र आता शासनाने त्यापैकी तीन गुंठे जागा खरेदीसाठी परवानगी देऊन खरेदीचे मुख्याधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. याबाबतचा विषय सभेसमोर ठेवलाअसता सदर जागा खरेदी करण्यास व मुख्याधिकारी यांना अधिकार देण्यास निलेश परब, उदय मांजरेकर, संध्या तेरसे यांनी विरोध दर्शवला. मात्र बालोद्यानसाठी जागा खरेदी करा अशी भूमिका प्राजक्ता बांदेकर यांनी मांडून सहकार्य करण्याचे आवाहन केले. चांदणी कांबळी यांनी त्याला समर्थन दिले. आमदार वैभव नाईक यांनी गार्डनसाठी मंजुरी व निधी आणला त्यावेळी त्या कामाला विरोध करण्यात आला मग आता त्याच जागेतील तीन गुंठे जमीन घेऊन पैसे वाया का घालवता, असे किरण शिंदे यांनी विचारले. तर दोन-तीन महिन्यात विचार कसे बदलतात, याकडे उदय मांजरेकर यांनी लक्ष वेधले. आम्ही तेव्हा विरोधात होतो. आजही विरोधात आहोत. मात्र तेव्हा विरोधात असणारे आज ती जागा खरेदीसाठी आग्रही का असा सवाल निलेश परब यांनी केला. स्थानिक नगरसेविका चांदणी कांबळे यांनी सदर जागा घाटासाठी खरेदी करावी अशी मागणी केली.
दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक मंदार शिरसाट म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी गार्डनसाठी निधी आणला आहे. तो मागे जाऊ नये यासाठी बालोद्यांसाठी तीन गुंठे जागा खरेदीचा ठराव घ्यावा. तर शहराच्या पर्यटन विकासासाठी सहकार्य करा, असे आवाहन प्राजक्ता बांदेकर यांनी केले. प्रत्येक गोष्टीला विरोध चालणार नाही असे सांगत आपला इरादा स्पष्ट केला.

You cannot copy content of this page