शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून नवी इनींग सुरू..
⚡सावंतवाडी ता.२१-: केवळ जिद्द, चिकाटी, अपार मेहनत, महत्वाकांक्षा, प्रामाणिकपणा व संघटनकौशल्य या गुणांच्या जोरावर शिवसेना शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख असा प्रेरणादायी प्रवास करणारे कतृत्ववान नेतृत्व म्हणजे शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब.
आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची प्रथम शिवसेनेचे जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर आता शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची धुरा सोपविली आहे.
जिल्हाप्रमुखपदाच्या त्यांच्या या नव्या इनिंगच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा ..
सच्चिदानंद उर्फ संजू परब. शाखाप्रमुख, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस तालुकाध्यक्ष व त्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा प्रवक्ता ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष व आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एक थक्क करणारा राजकीय प्रवास. आपल्या नेतृत्वासोबत ज्या ज्या पक्षात त्यांनी प्रवेश केला त्या त्या पक्षात त्यांनी आपली छाप सोडत विविध पदे भुषविली व त्या पदांना व पक्ष संघटनेला न्याय दिला.
संजू परब या नावाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भल्याभल्यांना दखल घ्यायला लावली. आपल्या सडेतोड बोलण्याने विरोधकांना अंगावर घेतले तर नगराध्यक्ष पदाच्या कार्यकालात तेवढ्याच ताकदीने प्रशासन चालवत आपण एक कार्यकुशल प्रशासक असल्याचेही आपल्या कतृत्वाने सिद्ध केले. कोरोनाच्या काळात घरात न बसता जीवावर उदार होऊन सावंतवाडीकरांसाठी रस्त्यावर उतरून त्यांना सहकार्य करत आपण केवळ राजकारण करीत नाही तर आपला वसा हा समाजकारणाचा आहे हे देखील विरोधकांना आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यामूळेच राजकारणात विरोधक असले तरीही सर्वपक्षीय नेत्यांना संजू बद्दल नेहमीच आदर राहिला आहे.
मडूरा सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांचे शिक्षण व पदवी शिक्षण सावंतवाडीतच झाले. मुळापासून नेतृत्वाचे गुण असणारा हा कार्यकर्ता माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या संपर्कात आला आणि त्या परिस स्पर्शाने अक्षरशः सोने होऊन गेला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. मैत्री जपण्याची एक विलक्षण हातोटी संजू परब यांच्याकडे आहे. मैत्रीला नि:स्वार्थपणे जागणारा एक उत्तम मित्र. असा त्यांचा त्यांच्या मित्रपरिवारात लौकिक आहे. स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू. एखाद्या पक्षाच्या नेत्यापासून ते समपातळीवरील नेत्यांपर्यंत आणि छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांसमोर ही ते अत्यंत स्पष्टपणे व परखडपणे आपली भूमिका मांडतात. त्यांनी मांडलेली मते, घेतलेली भूमिका अथवा निर्णय अचूक असतात. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी त्या निवडणुकीचे सर्वोत्तम व्यवस्थापन हा आजच्या राजकारणाचा विजयी मंत्र आहे. संजू परब यांना हाच मंत्र गवसला आहे त्यातूनच पक्षनेतृत्वाने कोणत्याही निवडणूकीची जबाबदारी ते लिलया पार पाडतात व दैदिप्यमान यशही मिळवत विरोधकांना त्यांच्याच सारीपाटावर अक्षरशः चितपट करतात. त्यांच्या या निवडीबद्दल ग्लोबल महाराष्ट्रा परिवाराकडून त्यांचं खूप खूप अभिनंदन..
