ओरोस ता १८
सिंधुदुर्ग ही ज्ञानाची भूमी आहे. जे विद्यार्थी आज इस्त्रोला जाणार आहेत. त्यांनी येथे सहलीला न जाता तेथील घडामोडींची अभ्यास करावा. सिंधुदुर्गातील मराठी माध्यम शाळा टिकण्यासाठी केवळ लेखी परिक्षांवर भर न देता मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. दशावतार मुलींनी सादर करणे जसे नावीन्य आहे तसे मुलांना कविता, नाटक लिहिण्यासाठी संगीत, गायन शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे, असे आवाहन नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन वर्षात आठवी गटामध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यांत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या ४८ विद्यार्थ्यांची आज तिरुअनंतपुरम येथील इस्त्रो विज्ञान सेंटर येथे अभ्यास दौरा निघाला आहे. १८ ते २२ मार्च असा हा अभ्यास दौरा राहणार आहे. त्या विद्यार्थ्यांना सकाळी जिल्हा परिषदेच्या छत्रपती संभाजी राजे सभागृहात शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.
२०१८ पासून जिल्हा परिषदेने हा उपक्रम सुरू केला आहे. स्कॉलरशिप परीक्षेच्या धर्तीवर भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवी या वर्गासाठी घेतली जाते. त्यातील चौथी गटातील आठही तालुक्यातील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना गोवा येथे तर सातवी गटातील आठही तालुक्यातील प्रथम तीन टॉपर विद्यार्थ्यांना इस्त्रो येथे नेण्यात येते. मात्र, गेल्या दोन वर्षात या उपक्रमाला खो बसला होता. २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन वर्षात सातवी गटातील परीक्षेत आठही तालुक्यांत प्रथम तीन टॉपर राहिलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा आज इस्त्रो येथे रवाना झाला. ४८ विद्यार्थ्यांची निवड झाली असलीतरी एका विद्यार्थ्याची तब्बेत बरी नसल्याने ४७ विद्यार्थी, चार शिक्षण, शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी यांचा यात समावेश आहे.
यावेळी बोलताना इस्त्रो सहलीतून एखादा शास्त्रज्ञ घडावा. त्यातून जिल्ह्याचे नाव उज्वल केले तर जिल्हा परिषदेचा हा उपक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल, असे सांगितले. उपशिक्षणाधिकारी आंगणे यांनी बोलताना २०२५ ची भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा २०२४-२५ ही परीक्षा ९ मार्च रोजी संपन्न झाली आहे. या परीक्षेत टॉपर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा ही संधी मिळणार आहे, असे सांगितले.
चौकट
आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी सेवा बजावली आहे. या जिल्ह्यात प्रतिभावंत व्यक्तींची कमतरता नाही. जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी असताना १९९८ मध्ये सिंधू महोत्सव भरविण्यात आला होता. त्यावेळी मी जिल्ह्यातील प्रतिभावंत व्यक्तींची यादी काढत होतो. त्या काळात आय टी क्षेत्र विकसित नव्हते. परंतु त्या काळात सुध्दा जिल्ह्यातील व्यक्ती आय टी क्षेत्रात नाव कमवून होते, असे सी ई ओ खेबुडकर यांनी सांगितले. यावेळी खेबुडकर यांनी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील आकाशवाणी केंद्र, दूरदर्शन केंद्र यांची भेट घडवून आणावी. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांची भेट घडवून आणावी. हे अधिकारी कोणते काम करतात ? त्यांची जबाबदारी काय ? याचे ज्ञान त्यांना यातून अवगत करून द्यावे, असे आवाहन केले.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: इस्त्रो सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांसमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगणे
