कुडाळ : महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगातर्फे दिला जाणारा 2024 चा बालस्नेही पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बालकल्याण समितीला अलीकडेच मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. बालस्नेही कल्याण समिती या नामांकन प्रकारात कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हा बालकल्याण समितीला हा पुरस्कार मिळाला आहे. सिंधुदुर्ग बालकल्याण समितीचे अध्यक्ष ऍड. संदेश ताशेटे आणि त्यांचे सहकारी ऍड नम्रता नेवगी, माया रहाटे, अमर निर्मळे, ऍड अरुण पणदूरकर या सर्वांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय केळकर, आमदार मनीषा कायंदे, राज्य बाल आयोग अध्यक्ष सुशी बेन शहा, बालहक्क आयोगाचे सदस्य आयुक्त श्री. नारनवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी अत्यंत संवेदनशीलपणे कार्य केल्याबद्दल कोकण विभागातून बालकल्याण समिती सिंधुदुर्गला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या विषयी बोलताना समिती अध्यक्ष ऍड. संदेश तायशेटे म्हणाले, ही बाल कल्याण समिती प्रत्येक जिल्ह्याला राज्यपालांच्या सहित नेमणूक केली जाते. या समितीचे काम म्हणजे अशी बालके अशी मुले की ज्यांचे आई-वडील नाहीत किंवा एकल पालक आहेत किंवा दुर्धर आजाराने आजारी आहेत किंवा कौटुंबिक वादविवाद आहेत, अशा बालकांसाठी ही समिती ही आई-वडिलांचे काम करते. वेगळ्या पद्धतीचे काम आहे. गोपनीय काम चालते. कारण मुलांचं सर्वोत्तम हित पाहिले जाते. आम्हाला पुरस्कार मिळाला याच्या पाठीमागे फक्त बालकल्याण समिती सिंधुदुर्गचेच काम आहे असे नाही, तर बालकल्याण समितीच्या या यशामध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे, बालगृहाचे अधीक्षकश्री. काटकर सर, स्वाती पाटील आणि विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मृगाली नाईक देशपांडे, आमचे मेंटॉर आणि माजी अध्यक्ष ऍड. पी. डी. देसाई यांच्यासह इतर अनेकांचे सहकार्य असल्याचे समितीचे अध्यक्ष ऍड. संदेश तायशेटे यांनी सांगितले.
ऍड. तायशेटे पुढे म्हणाले, गेल्या वर्षीपासून हा पुरस्कार जाहीर झाला. गेल्यावर्षी आम्हाला पुरस्कार मिळाला नव्हता. यावर्षी आम्ही खूप चांगले काम केले. प्रथम बालक, म्हणजे बालकाचे सर्वोत्तम कशा पद्धतीने राखले जाईल, सिंधुदुर्गातील बालकावर अन्याय होणार नाही, या दृष्टीने आम्ही कायम काळजी घेतली. आणि त्याचेच आम्हाला हे फळ म्हणजे पुरस्कार मिळालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्यांदाच पुरस्कार मिळाला आणि तो बालकल्याण समिती सिंधुदुर्ग ने पटकावला त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. परंतु म्हटल्याप्रमाणे माझी पूर्ण समिती सदस्य आणि इतर विभाग जे आहेत त्यांचं सर्वांचे हे यश आहे. हे वार्षिक पुरस्कार असतात. ते गेल्या वर्षीपासून सुरू झाले आहेत.वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कर असतात. पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, बालगृह अधीक्षक, कर्मचारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि त्यांचा कार्यालय त्यांचा कक्ष असे वेगळी पुरस्कार गेल्या वर्षीपासून द्यायला सुरुवात केल्याचे ऍड. तायशेटे शेवटी म्हणाले.
बाल स्नेही’ पुरस्काराने सिंधुदुर्गच्या बाल कल्याण समितीचा गौरव…
