मालवण तालुक्यात लेप्टोचे सहा रुग्ण सापडल्याने खळबळ

*💫मालवण दि.२८-:* कोरोना महामारी संकटात एकीकडे मालवण तालुका कोरोनामुक्तीकडे वळत असताना दुसरीकडे तालुक्यात लेप्टोस्पायरोसिस तापसरीचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यात लेप्टोस्पायरसिस चे रुग्ण वाढत असून गेल्या आठ दिवसात सहा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क बनली आहे. दरम्यान तालुक्यात काळसे, चिंदर, राठीवडे, असरोंडी, धामापूर व शिरवंडे या गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडून आला आहे. सहाही रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी दिली. लोकांमध्ये कोरोनाचे भय असताना तालुक्यात लेप्टोस्पायरसिस च्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या तीन वर्षांत ज्या गावात लेप्टो रुग्ण सापडले होते ती गावे जोखीम ग्रस्त म्हणून नोंदली जातात. तालुक्यातील अश्या २८ गावात गोळ्या वाटप, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. ती २८ गावे वगळून अन्य ठिकाणी रुग्ण सापडले. त्या गावातही गोळ्या वाटप करण्यात आले. तापसरीच्या पार्श्वभूमीवर ओवळीये व अन्य गावात सर्वे करण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. उंदीर व अन्य प्राण्यांचे मलमूत्र शेतातील पाण्यात मिसळते. शेतीत काम करणाऱ्या व्यक्तीला जखम झाली असल्यास दूषित पाण्याद्वारे जखमेतून लेप्टो मानवी शरीरात प्रवेश करतो. ताप व अन्य लक्षणे दिसून येतात. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा मालवण ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करावा. त्या ठिकाणी लेप्टो टेस्ट किट उपलब्ध आहेत. त्याद्वारे तात्काळ तपासणी करावी. तसेच शेतीत पाण्यात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page