रिया गावडे ठरल्या पैठणीच्या मानकरी…

पाडलोसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम : गाव व्हाट्सअप ग्रुपचे आयोजन..

बांदा : प्रतिनिधी
उखाणे घेताना शब्दांची जुळवाजुळव करताना महिलांची उडालेली घांदल… मैत्रिणी व पतीराजाकडे पाहून केलेले स्मित हास्य… समोरच्या गटाला हरविण्यासाठी केलेली धावपळ महिलांसह मुलामुलींनी विविध गाण्यांच्या तालावर धरलेला ठेका… अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांचे सुरू असलेले अटीतटीचे प्रयत्न अन् वेळप्रसंगी हसत-हसत हार पत्करून समोरच्या महिलेच्या विजयाचा साजरा केलेला आनंदोत्सव… अशा खेळीमेळीच्या वातावरणात पाडलोस मध्ये ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. अंतिम फेरीत बाजी मारत 25 महिलांमधून रिया राजाराम गावडे यांनी मानाची पैठणी जिंकली, तर अदिती अमोल माधव या उपविजेत्या ठरल्या.

महिलांना धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ काढता यावा यासाठी शिवजन्मोत्सवा निमित्त पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप तर्फे खेळ पैठणीचा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह गावातील ग्रामस्थांनी विविध कला सादर केले. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमात संगीता सगुण गावडे तृतीय तर तेजल कृष्णा गावडे यांनी चौथा क्रमांक मिळवला. ग्रुपचे अध्यक्ष राजाराम गावडे, संस्थापक विश्राम गावडे तसेच मान्यवरांच्या हस्ते पैठणीच्या मानकरी रिया गावडे यांना पैठणी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे समालोचन बादल चौधरी व राजू शेटकर यांनी केले. अन्य स्पर्धातील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. सचिव प्रणित गावडे यांनी आभार मानले.

फोटो ——-
पाडलोस : पैठणीच्या मानकरी रिया राजाराम गावडे यांना पैठणी देऊन सन्मानित करताना मान्यवर. सोबत बादल चौधरी, अदिती माधव, संगीता गावडे, तेजल गावडे व मान्यवर.

You cannot copy content of this page