⚡मालवण ता.२२-:
समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या पुणे हडपसर येथील रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) आणि शुभम सुनील सोनावणे (वय २२) या दोन युवकांचा तारकर्ली च्या समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर या दोघांना वाचविण्यास गेलेल्या ओंकार अशोक भोसले (वय २४) याला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील हडपसर येथे राहणारे कुश संतोष गदरे (वय- २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), ओंकार अशोक भोसले (वय- २६), रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) शुभम सुनील सोनवणे (वय २२) हे पाच युवक तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले असता आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास हे पाचही युवक समुद्रस्नानासाठी गेले होते. यावेळी रोहित कोळी आणि शुभम सोनवणे या दोघेही समुद्रात बुडू लागले. यावेळी रोहन डोंबाळे, ओंकार भोसले यांनी मदतीसाठी समुद्रात धाव घेतली. यावेळी स्थानिक वॉटरस्पोर्ट्स मंडळींनी समुद्रात धाव घेत वाचविण्यास गेलेल्या रोहन आणि ओंकार यांना किनाऱ्यावर आणले. यानंतर ग्रामस्थांनी समुद्रात राबविलेल्या शोध मोहीमेत समुद्रात बुडालेल्या रोहित कोळी व शुभम सोनावणे यांचे मृतदेह सापडून आले.
तर अत्यवस्थ बनलेल्या ओंकार भोसले याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
बचाव कार्यात स्थानिक ग्रामस्थ समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्टचे कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस हेडकोंस्टेबल श्री. जानकर हे करत आहेत.
