हिम्मत असेल तर पुन्हा निववडून येऊन दाखवा…

राजन नाईक यायचे ‘त्या’ नगरसेवकांना आव्हान:’त्या’ नगरसेविके विरोधात केस दाखल – मंदार शिरसाट..

⚡कुडाळ ता.१५-: ठाकरे शिवसेनेतून फुटून भाजप मध्ये गेलेल्या नगरसेवकानी हिंमत असेल तर नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकीला सामोरे जावे, असे आव्हान ठाकरे शिवसेने कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी, भाजपवासी झालेल्या नगरसेवकांना दिले.
हे शहराच्या विकासासाठी नव्हे तर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच भाजपात गेले आहेत. त्या नगरसेवकांची माजी खासदार विनायक राऊत व माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टिका करण्याची पात्रता नाही. असेही राजन नाईक यांनी म्हटले आहे.
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व न.पं. नगरसेवक मंदार शिरसाट यांनी शनिवारी सायंकाळी शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेऊन भाजपवासी झालेल्या नगरसेवकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी तालुका संघटक बबन बोभाटे, स्वीकृत नगरसेवक संतोष शिरसाट, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, गुरू गडकर, अमित राणे, बंड्या कोरगावकर व गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.
     नाईक म्हणाले, ठाकरे शिवसेनेतून फुटून भाजपात गेलेले सर्व गद्दार नगरसेवक शहराच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठीच गेले आहेत. त्यामुळे कोणतेतरी कारण हवे म्हणून त्यांनी आमच्या नेत्यांवर टिका करून स्वतःचेच अज्ञान प्रकट केले आहे. माजी खासदार विनायक राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्याचे सचिव आहेत तर मंदार शिरसाट हे न.पं. सभागृहाचे गटनेते होते. त्यामुळे सचिव या नात्याने राऊत शिरसाट यांच्याशी चर्चा करायचे आणि त्या चर्चेची सर्व माहीती गटनेते शिरसाट वेळोवेळो सर्व सहकारी नगरसेवकांना द्यायचे. श्रुती वर्दम या नगरसेविका आर्थिक फायद्यासाठी अगोदर फुटूनल गेल्या, त्यांनाही फुटून जाण्यासाठी याच नगरसेवकांनी पाठबळ दिले होते. त्यांनतर आता जे नगरसेवक फुटले, ते भाजपात प्रवेश करण्यापूर्वी माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे धनलाभ होईल म्हणून गेले होते. परंतू नाईक यांनी त्यांना स्पष्ट सांगितले की, तुम्हाला निवडून आणण्याचे काम पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांनी केले आहे. तुमी असा चुकीचा निर्णय घेऊ नका, पक्षातच थांबा असे नाईक यांनी सांगितले होते. तरीही न थांबता त्यांनी पक्षांतर केले यातून त्यांना आर्थिक पाठबळाची गरज होती, म्हणूनच त्यांनी पक्षांतर केले. न.पं. निवडणूकीवेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्या वडीलांनी मला व माजी आमदार वैभव नाईक यांना भेटून, जो मुलगा माझा झाला नाही तो तुमचा काय होणार? असे सांगून त्याला तिकीट देऊ नका असे सांगितले होते. मात्र वैभव नाईक यांनी आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांना तिकीट देऊन अहोरात्र मेहनत घेऊन त्यांना निवडून आणले. अडीच वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात आताच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली होती तेव्हाच कुडाळ न.पं.त शिंदे नावाचा एक नगरसेवक गद्दारी करणार हे आम्हाला माहीत होते. तरीही पक्षाने त्यांना उपनगराध्यक्ष केले. परंतू त्यांनी आता पक्षाशी गद्दारी केली असून, त्यांच्या वडीलांनी सांगितलेले भाकीत खरे ठरले आहे. दुसरे नगरसेवक उदय मांजरेकर यांनाही निवडून आणण्यासाठी वैभव नाईक यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. तरीही ते सुद्धा फुटले. त्यामुळे भाजपात गेलेले सर्व नगरसेवक हे आमिषालाच बळी पडल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप राजन नाईक यांनी केला. शिंदे यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा गैरवापर करून, स्वतःच्या मुलीला न.पं.त कंत्राटी पद्धतीने नोकरीला लावल्याचा आरोपही नाईक यांनी यावेळी केला.

‘त्या’ नगरसेविके विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे केस – मंदार शिरसाट

    मंदार शिरसाट म्हणाले, न.पं.त महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता आली तेव्हा, सुरूवातीची अडीच वर्ष काॅग्रेस आणि पुढची अडीच वर्ष ठाकरे शिवसेनेचा नगराध्यक्ष असा फाॅर्म्युला ठरविण्यात आला होता. आपण गेली सोळा वर्षे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहे. त्यामुळे अडीच वर्षानंतर आमच्या पक्षाच्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला न्याय मिळावा यासाठी हा माझा आग्रह निश्चित होता आणि यात माझा कोणताही स्वार्थ नव्हता. कारण नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला होते. त्यामुळे मी स्वतः नगराध्यक्ष होईन हा माझा अजिबात स्वार्थ नव्हता आणि फुटून गेलेल्या नगरसेवकांचेच म्हणणं होतं की आम्हाला संधी मिळाली पाहिजे. त्यानंतर श्री देव कुडाळेश्वर मंदिरात सर्व नगरसेवक एकत्र येऊन आम्ही जो पक्षाचा नगराध्यक्ष असेल त्याला पाठिंबा देऊ असा निर्णय घेतला होता. परंतू ते फुटून भाजपात गेले. त्यामुळे त्यांनी माझ्या हट्टापायी सत्ता गेली म्हणणे चुकीचे आहे. तसेच गटनेता म्हणून व्हीप बजावूनही नगरसेविका श्रुती वर्दम यांनी व्हीप डावलला. त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याची केस 12 फेब्रुवारीला आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केल्याचे शिरसाट यांनी सांगितले. जर भाजपात गेलेले नगरसेवक आपण शहर विकासासाठी भाजपात गेल्याचे सांगत असतील तर कालच झालेल्या न.पं.च्या सभेत विकासात्मक 14 विषय असताना, चौथा विषय चालू असताना त्यांनी सभागृह का सोडले?. तो शहर विकासाचा मुद्दा नव्हता. भाजपचे 16 नगरसेवक असताना 9 नगरसेवक बाहेर का पडले? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला
    संतोष शिरसाट म्हणाले, न.पं.त महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचा गट स्थापन केला आणि त्यानंतर नगराध्यक्ष निवडीवेळी श्री देव कुडाळेश्वर मंदिरात जात नारळ ठेवून आम्ही पाच वर्षे एकत्र राहू, अशी सर्व नगरसेवकांनी नारळाला हात ठेवून शपथ घेतली होती. तरीही सात नगरसेवक फुटले. हे नगरसेवक देवाला फसवू शकतात मग जनतेला का फसवणार नाहीय?. फुटलेल्या या नगरसेवकांना प्रत्येकी 15 लाख आणि मध्यस्थी करणा-याला 10 लाख रूपये मिळाल्याचे आमचे ठाम मत असून ही खात्रीलायक माहीती भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला दिली आहे. तसेच यापूर्वी फुटलेल्या नगरसेविका श्रुती वर्दम याही 25 लाख रूपये घेऊन फुटल्या असून यात त्यांच्या पतीचा मोठा सहभाग आहे. त्यांना माजी आमदार वैभव नाईक यांनी वेळोवेळी लाखो रूपयांची मदत केली आहे. परंतू 25 लाखाच्या आमिषाला त्या बळी पडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
बबन बोभाटे म्हणाले, ठाकरे शिवसेनेतून भाजपात गेलेल्या नगरसेवकांनी आपल्या सोबत किती कार्यकर्ते आले याचे आत्मपरीक्षण करावे. पती-पत्नी मिळून फक्त 14 कार्यकर्त्यांनीच हा भाजप प्रवेश केला आहे. या नगरसेवकांना निवडून येण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे, त्यांना वा-यावर सोडून या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. या नगरसेवकांना निवडून येण्यासाठी मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आम्ही कुठेही जाणार नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहणार असल्याचे आम्हाला सांगितले आहे.

You cannot copy content of this page