शासकीय तंत्रनिकेतन मालवणच्या ९० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड…

⚡मालवण ता.०५-:
शासकीय तंत्रनिकेतन, मालवणने यंदाच्या प्लेसमेंट सत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या प्लेसमेंट डेटानुसार, महाविद्यालयातील ९० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड होऊन त्यांना रोजगार मिळाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य प्रकाश शिरहट्टी यांनी दिली आहे.

पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने इलेक्ट्रिकल-१६, इलेक्ट्रोनिक्स २७ तर मेकॅनिकलच्या २३ विद्यार्थ्यांची निवड केली. जीई एरोस्पेस पुणे या कंपनीत मेकॅनिकलच्या १० तर इलेक्ट्रिकलच्या ८ विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच Proarc Welding & Cutting Systems या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल-०२ आणि इलेक्ट्रोनिक्सच्या ४ विद्यार्थ्यांची निवड झाली. सद्यस्थितीमध्ये विविध नामवंत कंपन्या फिलिप्स हेल्थकेअर पुणे, लार्सन & टुब्रो मुंबई, IFB ह्या कंपन्यानी ऑनलाइन पद्धतीने नियुक्तीसाठी भाग नोंदलेला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. एस. शिरहट्टी आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी श्री. आर. बी. बोर्डे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या परिश्रमासोबतच महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले आहे. संस्थेच्या या कामगिरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा राहिला आहे, असे त्यांनी सांगितले. या निवडीसाठी प्राचार्य श्री. पी. एस. शिरहट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतीद्वारे निवडीसाठी प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी राहुल बोर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच इतर सर्व शाखांचे विभाग प्रमुख व विभागातील प्लेसमेंट अधिकारी यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page