महसुल विभाग गांधारीच्या भूमिकेत ; अज्ञाताच्या तक्रारीनंतर महसुलची कारवाई..
⚡दोडामार्ग ता.०५-: तालुक्यातील पडवे माजगाव येथून माती उत्खननाच्या नावाखाली खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे उत्खनन केलेले हे खनिज दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी डम्पिंग केले जात आहे यासंदर्भात अज्ञाताने महसूल कडे केलेल्या तक्रारीनंतर मोरगाव येथे खनिज सदृश्य मातीच्या तब्बल २३४.६७ ब्रास साठ्यावर येथील महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईने गौण खनिज तस्करी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
दरम्यान गोरगरीब जनतेवर तात्काळ कारवाईचा बडगा उगाणारा महसूल विभाग पडवे माजगाव येथे बिनधोकपणे सुरू असलेल्या या उत्खननाकडे का डोळेझाक करत आहे हाच प्रश्न आहे अधिकाऱ्यांचे हात यामध्ये ओले तर झाले नाही ना असा प्रश्न आता सर्व सामन्यातून विचारला जात आहे.
सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव गेल्या आठ दिवसांपासून माती उत्खननाच्या नावाखाली खनिज उत्खनन करून लोहखनिजयुक्त मातीचा मोरगाव येथे साठा केला जात आहे. हा साठा करण्यासाठी एका त्रयस्त व्यक्तींनी जमीन लीज वर घेतली आहे. या ठिकाणी मातीची साठवणूक करण्यासाठी संबंधित व्यक्तींनी महसूल विभागाकडून अकृषिक सनदही मिळवली. कळणे खनिज प्रकल्पातून माती वाहतूक करत असल्याचे भासवण्यासाठी लोहखनिज वाहतूकीचे पासही संबंधित व्यक्तींकडे आहेत. या व्यवसायात गोवा येथीलही काही बडे लोक गुंतलेले स्थानिक व्यक्तींच्या आधारातून काही राजकीय पुढाऱ्यांना व अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यावधींचा खनिज घोटाळा सुरु आहे.
गतवर्षी आणि गेल्या आठ दिवसात रात्रीच्या वेळी कोट्यावधींच्या खनिजाची वाहतूक केली गेली. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे एका अज्ञात तक्रारदाराने महसूल विभागाकडे तक्रार दिली. या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी तलाठी श्री. लोले हे घटनास्थळी गेले. यावेळी त्यांच्यासमोर एक डंपर माती खाली करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी पंचनामा करून मातीचे मोजमाप घेतले व पंच यादी करून तहसीलदार कार्यालयात पाठविले त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे
चौकट
मातीची ग्रेड ४५ ते ५८ची ग्रेड!
कळणे खनिज प्रकल्पाच्या परिसरातील काही गावात पृष्ठभागावरील मातीत ४८ ते ५८ पर्यतच्या ग्रेडचे लोहखनिज आढळते. छोट्या टेकड्या, डोंगर उताराच्या जागा रात्रीच्या वेळी खोदून ही खनिजयुक्त माती काढून साठवली जाते. त्यानंतर कळणे मायनिंगचे खनिज वाहतूक पास वापरून हॆ खनिज म्हणून गोवा, कर्नाटक भागात विकण्यात येते. यातून कोट्यावधीची उलाढाल केली जात असून शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडवला जात आहे. मात्र तरीही खनिकार्म अधिकारी, महसूल व पोलीस प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
