सिंधुदुर्गातील महायुतीचे उमेदवार मतांवर डल्ला मारून विजयी…

काँग्रेस सचिव अनंत बरगे यांचा आरोप:राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काँग्रेसची पत्रकार परिषद..

⚡कुडाळ ता.२५-: निवडणूका या निष्पक्षपाती व पारदर्शक घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. पण त्यांनी आपले कर्तव्य पार पाडताना बेइमानी केल्याची अनेक उदाहरणे असून सिंधुदुर्गतील खासदार आमदारांसह निवडून आलेले महायुतीचे सरकार म्हणजे अतिरिक्त मतावर डल्ला मारून निवडून आलेले सरकार आहे. असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
ते आज कुडाळ येथे मतदार दिना निमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मतदार जागृती केली जात आहे. त्या निमित्ताने ते कुडाळ येथे आले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, नागेश मोरये, एकनाथ धुरी, केतनकुमार गावडे, अरविंद मोंडकर, साईनाथ चव्हाण, प्रदीप मांजरेकर, आय वाय शेख, मेघनाद धुरी, प्रवीण वरूणकर, श्रीकृष्ण , पांडुरंग नाटेकर, अजिंक्य गावडे,जेम्स फर्नांडिस, निलेश मालडकर, ऍड. अमृता मोडकर उपस्थित होते.
श्री. बरगे पुढे म्हणाले, निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था स्वायत्त आहे. पण मोदी सरकारने सर्वच संवैधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप केला आहे. निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचे पूर्वीचे निकष बदलून भाजपच्या कार्यकर्त्या सारखा काम करणारा आपल्या मर्जीतील निवडणूक आयुक्त नियुक्त करता येईल अशा प्रकारचे निवडणूक आयोगाच्या नियुक्तीचे निकष बनवून आपल्या मर्जीतील राजीवीकुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे आणि राजीवकुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. विधानसभा निवडणूकांपूर्वी सहा महिने लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या संपूर्ण महाराष्ट्रात महायुती विरोधात जनतेच्या मनामध्ये असंतोष होता आणि ते निवडणूकीत दिसून आले मग पाच महिन्यात असा काय चमत्कार घडला आहे? अशी कोणती गोष्ट झाली असा प्रचंड विजय महायुतीला मिळाला? अशी शंकाही बरगे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश हे राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अनाकलनीय आहे. महायुतीच्या बाजूने कोणतीही लाट नसताना सहा महिन्याभरापूर्वी इझमलेल्या लोकसभा निवडणुकीच्या एकदम उलट निकाल कसे काय लागू शकतात असा प्रश्न राजकिय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य जनतेला पडला आहे. असेही या वेळी बोलताना बरगे यांनी सांगितले.
महाराष्ट्रा विधानसभेच्या निवडणूका या निष्पक्ष व पारदर्शकपणे झालेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यात घोटाळा करण्यात आला. लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणूक या सहा महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात 50 लाख मतदार कसे वाढले. 2019 ची निवडणूक आणि 2024 ची निवडणूक या पाच वर्षात 5 लाख मतदार वाढले होते. मग 2024 ची लोकसभा निवडणुक ते विधानसभा निवडणूक या सहा महिन्यातच 50 लाख मतदार कसे वाढले. वाढलेल्या मतांचा डेटा संशयास्पद आहे. विधानसभा मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर वाढलेली 76 लाख मते सुद्धा संशयास्पद आहेत. या संदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे वाढीव मतांचे पुरावे मागितले परंतू निवडणूक आयोगाने पुरावे दिले नाहीत. ही मते कशी वाढली याचे उत्तर निवडणूक आयोग आजही देऊ शकले नाही. यामुळे यात काहीतरी गडबड आहे हे स्पष्ट दिसत आहे. असेही त्यांनी सांगितले.
मतदारांच्या मतावर निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी दरोडा टाकला आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष, पारदर्शक निवडणूका घ्याव्यात व त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम रहावी असे काम करावे. परंतू निवडणूक आयोग भाजपच्या फायद्यासाठी काम करत आहे हे लोकशाहीला घातक आहे. असेही बरगे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
दरम्यान काही राज्यात विरोधी पक्षांचे सरकार आहे, त्याबद्दल कॉंग्रेसचे काय म्हणणे आहे असे विचारले असता, श्री. बरगे म्हणाले, काही राज्यात भाजपने बघ्याची भूमिका घेतली. त्या ठिकाणी काँगेसचे सरकार निवडून आले. इतर ठिकणी त्यांनी बघ्याची भूमिका घेतली नाही म्हणून तिथे भाजपचे सरकार डल्ला मारून निवडून आल्याचे श्री. बरगे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

You cannot copy content of this page