काका कुडाळकर:कुडाळमध्ये पतंजली योग शिबिराचा शुभारंभ;पाच दिवस चालणार शिबीर..
कुडाळ : चायनीज फास्टफुडच्या जमान्याकडे वळणाऱ्या आजच्या विद्यार्थी तरुण वर्गाने आपले आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी योग प्राणायाम करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी पाच दिवसीय निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमात कुडाळ येथे केले
पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग मार्फत कुडाळ शहरामध्ये वासुदेवानंद ट्रेड सेंटर उद्यमनगर येथे संयुक्त योगोपचार शिबिर आजपासुन 23 ते 27 जानेवारी दरम्यान सकाळी 6:00 ते 7:30 या वेळेत दररोज पाच दिवशीय शिबिर संपन्न होत आहे . शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर, सावंतवाडी तहसिल प्रभारी लक्ष्मण पावसकर, कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्ष निलेश जोशी, सकाळ कुडाळ तालुका प्रतिनिधी अजय सावंत, रामनाथ सावंत, अनिल मेस्त्री रविद्र प्रभुदेसाई, आर्या शिरसाट, स्नेहांकिता माने, विशाल लाटये, प्रकाश आबिटकर , नारायण सावंत, ऐश्वर्या सावंत, योगसाधक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. कुडाळकर म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी योग ही काळाची गरज बनली आहे. या योगामध्ये मोबाईलच्या विळख्यात असणारा विद्यार्थी तरुण वर्ग खूप लांब आहे. हा वर्ग या योगाकडे वळला पाहिजे. आज फास्टफुड चायनीजच्या जमान्यात आपले आरोग्य अतिशय धोक्यात येत आहे. यावर तात्काळ मात करण्यासाठी आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी योग काळाची गरज बनली आहे असे सांगत आज कुडाळ येथे सुरू झालेल्या नि:शुल्क योग शिबिराला शुभेच्छा देताना कुडाळ योगमय कसे होईल यासाठी सर्वांचे सहकार्य असणे गरजेचे असे सांगितले.
मार्गदर्शक श्री बांदेकर यांनी सांगितले की, आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर योग एक काळाची गरज आहे. सावंतवाडी तालुक्यानंतर कुडाळमध्ये ही योग चळवळ सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हा सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ही चळवळ राबविताना आपला सिंधुदुर्ग जिल्हा योगमय कसा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नियमितपणे योगाभ्यास केल्याने आपण रोगमुक्त होतो. त्यामुळे प्रत्येकाने योगाभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच शिबिर चालू असे पर्यंत संपूर्ण कुडाळ मधील जनतेने या योगशिबिराचा लाभ घ्यावा असे श्री बांदेकर यांनी सांगितले.
श्री पावसकर यांनी भारतीय संस्कृतीत योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे. योगामध्ये आपले जीवन सुस्थितीत सुखकर होते. अनेक आजारावर मात करण्याचे माध्यम योग आहे. योगप्रशिक्षण योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखालीच प्रत्येकाने करावे. या योगाचे मार्गदर्शक बांदेकर यांनी ही योग चळवळ सुरू करण्यासाठी जे काही प्रयत्न केले आहेत ते निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारे आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा योगमय करण्यासाठी जी मोहीम हाती घेतली आहे त्याला सर्वांची साथ महत्त्वाची आहे, असे सांगितले.
पत्रकार अजय सावंत, निलेश जोशी, सौ माने यांनीसुद्धा याबाबत मार्गदर्शन केले. सुरुवातीला सर्व मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. श्री बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला. सूर्यनमस्कार, योगासने, सुक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम असा योगाभ्यास घेण्यात आला. शिबिराच्या पहिल्याच दिवशी 80 योगसाधकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल लातये , प्रास्ताविक सौ ऐश्वर्या सावंत यांनी केले . या शिबिरास कुडाळ मधील योगाभ्यास प्रेमींनी , तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला. वासुदेवानंद हॉल , कुडाळचे मालक प्रसाद नाईक यांनी या शिबिरासाठी लागणारे सभागृह, स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली.
