‘एक समृद्ध लोककला दशावतार‘ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन…

⚡वेंगुर्ला ता.२२-: खानोली गावचे सुपूत्र तथा दशावतार लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांच्या ‘एक समृद्ध लोककला दशावतार‘ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई येथे संपन्न झाले.

  प्रा. खानोलकर यांनी कोकणातील मानबिदू असलेल्या दशावतार लोककलेवर संशोधनात्मक अभ्यास करून दशावतार लोककलेची समृद्धता ही ‘एक समृद्ध लोककला दशावतार‘ या पुस्तकातून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्रातील डिंपल पब्लिकेशन मुंबई, अशोक मुळे आणि कौस्तुभ मुळे यांच्या माध्यमातून होणार असून या पुस्तकाला दशावतार लोककलेवर पहिली डॉक्टरेट मिळवणारे वेंगुर्ल्याचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध लेखक डॉ.अशोक भाईडकर यांची प्रस्तावना लाभली आहे.

  पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध डिझायनर महेंद्र जुवलेकर (श्याम आर्ट्स) यांनी केले असून या मुखपृष्ठावर लोकराजा सुधीर कलिंगण यांचा श्रीकृष्ण भुमिकेतील फोटो, पप्पू नांदोस्कर यांच्या करारी खलनायकीची छबी तर कोकणचे बाल गंधर्व ओम्प्रकाश चव्हाण यांची सात्विक मृद्रेतील फोटो तसेच अलिकडच्या काळातील सुप्रसिद्ध दशावतार कलावंत दत्तप्रसाद शेणई यांचा प्रसन्न हास्य मुद्रेचा फोटो त्याचबरोबर धयकाल्यातील संकासूर, महागणपतीचा मुखवटा आणि त्याच्या समोरी पेटता कंदील हा जुन्या दशावताराची आठवण करून देतो. तर गदा ही बदलत्या काळातील दशावतारातील नाविन्यपूर्ण बदल प्रतिबिंबित करते. मलपृष्ठावर दशावतारातील महत्त्वाचे अंग असणारी संगीतसाथ असून सोबतच कलावंतांच्या भुमिका सादरीकरण करण्यापूर्वीची तयारी करतानाचा फोटो आहे.

  या मुखपृष्ठाचे प्रकाशन नुकतेच भारतातील पहिले अखिल भारतीय भजन संमेलनाच्या उद्घाटन समारंभावेळी करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, भजन सम्राट लोकरे बुवा, हर्याण बुवा, मालवणी कवी दादा मडकईकर आदी उपस्थित होते. लवकरच हे पुस्तक रसिकांच्या भेटीला येणार असून दशावतारातील वैविध्यपूर्ण माहितीचा खजिन्यात अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.
You cannot copy content of this page